
अमेरिकेत करियर करू पाहणारे हिंदुस्थानी आयटी प्रोफेशनल्स आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. ट्रम्प सरकारच्या गृह मंत्रालयाने एच-1बी शुल्कात एक लाख डॉलर म्हणजे 99 लाखांपर्यंत वाढ करण्याची तयारी केली आहे. हे शुल्क लागू झाल्यास त्याचा मोठा फटका हिंदुस्थानला बसणार आहे. ट्रम्प सरकारने मागील वर्षी एच-1बी व्हिसा शुल्कात मोठी वाढ केली होती. न्यायालयात आव्हान देण्यात आल्यामुळे त्यास स्थगिती देण्यात आली होती. आता या शुल्कावर अंतिम शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवीन शुल्क किती असेल हे मंगळवारी अधिकृतरित्या संबंधित विभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहे. नवे शुल्क लागू झाल्यास या व्हिसासाठी 98 लाख 62 हजार 250 रुपये मोजावे लागतील.


























































