
अभिनेता सलमान खान आपल्या जवळच्या व्यक्तींच्या मदतीसाठी नेहमीच पुढे येतो, अशी त्याची ख्याती आहे. आता पुन्हा एकदा त्याची हीच बाजू समोर आली आहे. सलमान खानचा अनेक वर्षांपासून ‘बॉडी डबल’ म्हणून काम करणारे परवेझ काझी यांची प्रकृती बिघडल्यानंतर सलमानने त्यांच्या वैद्यकीय उपचारांची स्वतः काळजी घेतल्याचे वृत्त आहे. परवेझ काझी यांच्यावर याच महिन्याच्या सुरुवातीला हृदयाची किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, 6 ऑगस्टला घरी असताना परवेझ यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली. काही चाचण्या केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली.
परवेझ यांना चित्रीकरणाच्या सेटवर हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, त्यांच्या व्यवस्थापक पियुष यांनी ही घटना सेटवर घडली नसल्याचे स्पष्ट केले. परवेझ घरी असताना त्यांना त्रास जाणवला आणि त्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली होती. परवेझ यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच सलमान खानने तातडीने मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या उपचारांशी संबंधित आवश्यक व्यवस्था करण्यात सलमानने मदत केली. पियुष यांच्या म्हणण्यानुसार, सलमान परवेझ यांना धाकट्या भावाप्रमाणे मानतो आणि कठीण काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार परवेझ सध्या उपचारानंतर हळूहळू बरे होत असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे. या कठीण काळात सलमानने केलेल्या मदतीबद्दल परवेझ त्याचे आभार मानत असल्याचेही वृत्त आहे.
परवेझ काझी हे सलमानच्या आगामी ‘मॉन्स्टर’ या चित्रपटासाठीही काम करत आहेत. त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे काही काळ चित्रपटाच्या ॲक्शन शूटिंगच्या वेळापत्रकाबाबत चिंता निर्माण झाली होती. परवेझ यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी विश्रांतीची गरज असल्याने काही ॲक्शन दृश्ये सलमानला स्वतः करावी लागू शकतात, अशी चर्चा होती. मात्र, आता परवेझ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ते पुन्हा शूटिंगला परतण्याची शक्यता आहे. त्यांच्या आरोग्याचा विचार करून स्टंटच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. सेटवर परतल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती आहे.



























































