
राजधानी दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून स्वाईन फ्लूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या शाळांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने शहरातील सर्व सरकारी, अनुदानित आणि मान्यताप्राप्त खासगी शाळांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्यविषयक जनजागृती वाढवणे, संसर्ग प्रतिबंध करणे आणि श्वसन स्वच्छतेचे उपाय अधिक मजबूत करण्याचा सल्ला विभागाने दिला आहे.
शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, घसा खवखवणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थंडी वाजणे आणि ताप ही हंगामी इन्फ्लूएंझा किंवा H1N1 ची प्रमुख लक्षणे आहेत. मात्र पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी घाबरण्याची कोणतीही गरज नाही. वेळेवर जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. शाळांना निर्देश देण्यात आले आहेत की, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी खोकताना किंवा शिंकताना नाक व तोंडावर रुमालाचा वापर करावा, वापरलेले रुमाल योग्य प्रकारे नष्ट करावेत आणि साबण व पाण्याने वारंवार हात धुवावेत. विशेष करुन जेवण्यापूर्वी आणि खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हाताच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यास सांगण्यात आले आहे. श्वसनसंस्थेची लक्षणे असलेल्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतर राखणे आणि आवश्यकतेनुसार मास्क वापरणे गरजेचे असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच शाळांच्या वर्गखोल्या, सार्वजनिक जागा आणि वारंवार स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची नियमित स्वच्छता राखण्यासोबतच पुरेशी हवा खेळती राहण्याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळेच्या आवारात किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मज्जाव करत त्याबाबत जनजागृती करण्याचेही सांगण्यात आले आहे.
याशिवाय, भरपूर पाणी पिणे, पौष्टिक आहार घेणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्यावरही भर देण्यात आला आहे. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळण्याचे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे न घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांच्या आणि विभागांच्या उपशिक्षण संचालकांना या सर्व सूचनांच्या कठोर पालनावर देखरेख ठेवण्याचे आणि त्याचा संकलित अहवाल आगामी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत शिक्षण संचालनालयाच्या आरोग्य शाळा शाखेकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


























































