२०२३ पूर्वीच्या वाहनांसाठी E20 इंधन धोकादायक, सरकारी कारवाईच्या भीतीने कंपन्या गप्प – अरविंद केजरीवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या E20 पेट्रोलच्या सक्तीच्या वापरावरून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. २०२३ पूर्वी उत्पादित झालेल्या पेट्रोल वाहनांसाठी E20 इंधन अत्यंत धोकादायक असून, यावर उघडपणे बोलल्यास ईडी किंवा सीबीआयचे छापे पडतील, या भीतीने वाहन निर्मिती कंपन्या गप्प असल्याचा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला आहे. गोव्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांनी देशातील २९ वाहन निर्मिती कंपन्यांना पत्र लिहून २०२३ पूर्वीच्या वाहनांमध्ये E20 इंधन वापरणे सुरक्षित आहे का? अशी विचारणा केली होती. मात्र एकाही कंपनीने यावर लेखी उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांनी ९ प्रमुख कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी खासगीत चर्चा केली. २०२३ पूर्वी बनवलेल्या पेट्रोल वाहनांसाठी E20 हे अत्यंत धोकादायक इंधन असल्याचे या सर्व अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे, असा दावा त्यांनी केला.

केजरीवाल म्हणाले, “जुन्या वाहनांचे इंजिन खराब होण्याचा धोका असतानाही कंपनीचे अधिकारी यावर उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. त्यांच्यावर केंद्र सरकारचा प्रचंड दबाव आहे. जर त्यांनी E20 इंधनाच्या धोक्यांबद्दल आवाज उठवला, तर त्यांच्यावर सीबीआय, सक्तवसुली संचालनालय (ED) किंवा प्राप्तिकर विभागाचे छापे पडतील किंवा त्यांचे उत्पादन प्रकल्प बंद पाडले जातील, अशी भीती त्यांना सतावत आहे.”