
गुजरातच्या वडोदरा येथून मुंबईत ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या मलेशियन एअरलाईन्सच्या माजी एअर होस्टेससह साथीदारांना सुरत गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 30 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. तपासादरम्यान या महिलेचा अमली पदार्थांच्या व्यापारातील जुना इतिहास समोर आला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, वडोदरा ते मुंबई दरम्यान एका कारमधून एमडी ड्रग्ज नेले जात असल्याची गुप्त माहिती सुरत गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील एका टोल नाक्याजवळ संशयास्पद कार अडवली. तपासणीदरम्यान पोलिसांना वाहनात 977 ग्रॅम अमली पदार्थ सापडले.
मानसी सय्यद (41) आणि सोहेल सुलेमान शेख (20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तपासणीत अनेक मोबाईल फोन तसेच अमली पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आणि डबेही सापडले आहेत. त्यानंतर सय्यद आणि शेख यांना अटक करण्यात आली.
चौकशीदरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुंबईतून भाड्याच्या कारने अमली पदार्थ आणण्यासाठी वडोदरा येथे गेले होते. तेथे एका महिलेकडून त्यांनी ड्रग्ज घेतले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी मुंबईतील सांताक्रूझ भागात राहत होते आणि ते एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसी ही मलेशियन एअरलाईन्समध्ये एअरहोस्टेस होती आणि तिने विविध देशांचा प्रवास केला होता. मानसी 2015 पासून अमली पदार्थांच्या नेटवर्कच्या संपर्कात होती. यापूर्वी 2021 मध्ये इंदूर (मध्य प्रदेश) येथे तिच्याकडे सुमारे 100 ग्रॅम ड्रग्ज सापडल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. आरोपीला अमली पदार्थ पुरवणाऱ्या महिलेचाही पोलीस शोध घेत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





























































