
केंद्र सरकारच्या E – 20 इंधन धोरणावर आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली आहे. इथेनॉल निर्मितीसाठी ऊस वळवल्यामुळे देशात साखरेच्या किमती वाढल्या असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तसेच E – 20 इंधनामुळे वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी आपकडून ‘टाउन हॉल’ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले की, २५ लाख टन ऊस इथेनॉल निर्मितीसाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे देशातील साखरेच्या किमती वाढल्या आहेत. साखरेचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे भेसळयुक्त किंवा E – 20 इंधनामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच इथेनॉल मिश्रणामुळे परकीय चलनाची बचतही होत नसल्याचा दावा त्यांनी केला.
E – 20 इंधनाच्या तांत्रिक आणि आर्थिक परिणामांवर चर्चा करण्यासाठी आपकडून बुधवारी दुपारी ३ वाजता टाउन हॉल कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. या विषयावर नागरिकांना आपली मते आणि समस्या पक्षापर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी व्हॉट्सॲप क्रमांकही जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
E – 20 इंधनाबाबत वाहन उद्योगातील संघटनांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला. ‘भारताकडून नकार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी E – 20 इंधनाचा आग्रह का धरत आहेत?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (SIAM) E – 20 इंधनाचा वाहनांवर होणाऱ्या परिणामाबाबत चिंता व्यक्त केली होती आणि पेट्रोल पंपांवर ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी करणारा अहवाल सादर केला होता. मात्र, हा अहवाल सादर केल्यानंतर अवघ्या आठवडाभरात SIAM ला तो मागे घ्यावा लागला, असा दावा केजरीवाल यांनी केला. त्यामुळे वाहन उद्योगातील संबंधितांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.
नवीन इंधन मानकांबाबत काही वाहन उत्पादक कंपन्यांमध्येही साशंकता असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तीन वाहन कंपन्यांनी E – 20 इंधनाला पाठिंबा देण्यास नकार दिला असून वाहनांची E – 20 इंधनाशी सुसंगतता आणि तांत्रिक बाबींविषयी चिंता व्यक्त केली आहे. ब्राझीलमध्ये E – 20 इंधनाकडे संक्रमण करण्यासाठी अनेक दशके लागली. मात्र, भारतात केवळ तीन वर्षांच्या कालावधीत हे संक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा त्यांनी केला.
E – 20 इंधनाच्या तांत्रिक आणि ग्राहकांशी संबंधित प्रश्नांचे अद्याप पूर्णपणे निराकरण झालेले नसताना सरकारने हा बदल का लादला, असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला. “E – 20 इंधन विज्ञान आणि पुराव्यांवर आधारित असेल, तर योग्य प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा आवाज का दाबला जात आहे?”, असे ते म्हणाले.
इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण भविष्यात किती वाढवले जाणार, याबाबत सरकारकडे स्पष्ट दीर्घकालीन आराखडा नसल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली. सरकारकडून भविष्यात ई-२५, ई-३०, ई-४० आणि ई-८५ अशा टप्प्यांवर इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवले जाऊ शकते, मात्र याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. “सरकारला आणखी चाचण्यांची गरज नाही; विज्ञान, तज्ज्ञ आणि जनतेचे म्हणणे ऐकण्याची गरज आहे,” असे केजरीवाल यांनी सांगितले.





























































