
आगामी जनगणना २०२७ मध्ये भिकारी आणि भटक्या व्यक्तींची स्वतंत्र आकडेवारी नोंदवली जाणार नाही. जनगणनेच्या प्रश्नावलीत ‘भिकारी आणि भटके इत्यादी’ हा स्वतंत्र पर्याय वगळण्यात आला आहे. मागील जनगणनेत या वर्गवारीत नोंदवली गेलेली संख्या अत्यल्प असल्याने हा बदल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जनगणना २०११ मध्ये सुमारे ३.८ लाख बिगर-कामगार आणि सीमांत कामगारांनी स्वतःची नोंद ‘भिकारी आणि भटके’ म्हणून केली होती. यापूर्वी २००१ मध्ये ही संख्या सुमारे ६.३ लाख, तर १९९१ मध्ये सुमारे ५.४ लाख होती. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
२०११ आणि त्यापूर्वीच्या जनगणनेमध्ये ‘भिकारी आणि भटके इत्यादी’ यांचा ‘आर्थिक उत्पन्न नसलेल्या कार्यात’ सहभागी असलेल्या सीमांत आणि बिगर-कामगारांच्या स्वतंत्र वर्गवारीत समावेश केला जात होता. या वर्गवारीत विद्यार्थी, घरगुती काम करणारे, आश्रित, निवृत्तीवेतनधारक, भाडे उत्पन्नावर अवलंबून असलेले आणि इतर व्यक्तींचाही समावेश होता. मात्र, जनगणना २०२७ मध्ये भिकारी आणि भटक्यांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध नसेल. त्यांची नोंद आता ‘इतर’ या वर्गवारीत केली जाणार आहे. परिणामी देशातील भिकाऱ्यांची स्वतंत्र संख्या तसेच त्यांचे वय, धर्म, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आणि शैक्षणिक स्थितीनुसार वर्गीकरण यापुढे जनगणनेच्या स्वतंत्र तक्त्यांमध्ये उपलब्ध होणार नाही.
मागील जनगणनांमध्ये ‘भिकारी आणि भटके’ म्हणून नोंदवण्यात आलेली आकडेवारी विश्वासार्ह मानली जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या वर्गवारीशी संबंधित सामाजिक कलंकामुळे अनेक व्यक्ती स्वतःची नोंद भिकारी किंवा भटके म्हणून करण्यास इच्छुक नसल्याचे आढळून आले होते. जनगणनेच्या नियमांनुसार गणनाकर्त्याने संबंधित व्यक्तीने स्वतः घोषित केलेला व्यवसाय किंवा आर्थिक नसलेले कार्यच नोंदवायचे असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने स्वतःला भिकारी किंवा भटका म्हणून घोषित केले नाही, तर गणनाकर्ता स्वतंत्रपणे तशी नोंद करू शकत नाही. यामुळे प्रत्यक्ष संख्या आणि जनगणनेत नोंदवली गेलेली संख्या यामध्ये फरक राहण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जनगणना २०२७ मध्ये स्थलांतराच्या कारणांमध्येही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. स्थलांतराच्या कारणांच्या यादीत आता ‘नैसर्गिक आपत्ती’ हा स्वतंत्र पर्याय समाविष्ट करण्यात आला आहे. यापूर्वी नोकरी किंवा काम, व्यवसाय, शिक्षण, विवाह, जन्मानंतर स्थलांतर, कुटुंबासोबत स्थलांतर आणि ‘इतर’ अशी कारणे नोंदवली जात होती. आता पूर, दुष्काळ, भूकंप, चक्रीवादळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे स्थलांतर करणाऱ्या लोकांची माहिती स्वतंत्रपणे नोंदवता येणार आहे.
जनगणना २०२७ मध्ये आई-वडिलांच्या माहितीशी संबंधित काही अतिरिक्त तपशीलही नोंदवले जाणार आहेत. ‘वडिलांची माहिती’ आणि ‘आईची माहिती’ या अंतर्गत त्यांच्या जन्माची तारीख, जन्मस्थान आणि धर्म यांची माहिती घेतली जाणार आहे. मात्र, आई किंवा वडील त्याच कुटुंबात राहत नसतील किंवा त्यांचे निधन झाले असेल, तरच ही अतिरिक्त माहिती भरावी लागणार आहे. जनगणनेच्या कुटुंबीयांच्या फॉर्ममध्ये प्रत्येक सदस्याचा धर्म तसेच जन्मतारीख आणि जन्मस्थान यांची माहिती आधीपासूनच नोंदवली जाते. त्यामुळे आई-वडील त्याच कुटुंबात राहत असल्यास त्यांची ही माहिती स्वतंत्रपणे पुन्हा नोंदवण्याची आवश्यकता राहणार नाही.




























































