भाजपला रामराम ठोकताच प्रसिद्ध अभिनेत्याला मोठी ऑफर, TVK ने थेट प्रदेशाध्यक्षपद, तर काँग्रेसने…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकणारे मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते देवन लवकरच नवीन पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तामीळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम आणि काँग्रेस पक्षानेही आपल्याशी संपर्क साधल्याचा दावा देवन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. टीव्हीकेने आपल्याला थेट केरळच्या प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे टीव्हीके तामीळनाडूबाहेर विस्तार करण्याची योजना आखत असल्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या पाच वर्षांपासून भाजपमध्ये असूनही मला कोणतेही महत्त्वाचे काम दिले जात नव्हते. मला लोकांची सेवा करायची आहे, पण भाजपमध्ये मला केवळ बसवून ठेवण्यात आले होते, असा आरोप करत देवन यांनी 16 ऑगस्ट रोजी भाजपला रामराम ठोकला.

दरम्यान, राजीनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी तामीळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या कार्यालयातून देवन यांना फोन आला. त्याच दिवशी टीव्हीकेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या चालकुडी येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तीन तास चाललेल्या या बैठकीनंतर गुगल मीटद्वारेही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सविस्तर चर्चा पार पडली आहे, असेही समोर येत आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

काँग्रेससह स्थानिक पक्षांची ऑफर नाकारली

राजीनाम्यानंतर काँग्रेससह अनेक स्थानिक पक्षांनी संपर्क साधल्याचा दावा देवन यांनी केला. काँग्रेसच्या नेत्यांनी मला पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते, परंतु मी त्यांना नम्रपणे नकार दिला. स्थानिक पक्षांनाही मी नाही स्पष्ट केले. मात्र, विजय यांच्या टीव्हीके पक्षाची विचारसरणी आणि लोकांप्रति असलेली बांधिलकी माझ्या विचारांशी मिळतीजुळती आहे, असे देवन यांनी स्पष्ट केले.

तमिळनाडूत वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडर, महिलांना मोफत बस प्रवास; मुख्यमंत्री विजय यांची विधानसभेत घोषणा

विजय-देवन सहा चित्रपटात एकत्र

विजय आणि देवन यांनी जवळपास सहा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यापैकी बहुतांश चित्रपटात देवन यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. आमचे वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत आणि आमची विचारसरणीही एकच असल्याने एकत्र काम करणे सोपे जाईल, असेही देवन यावेळी म्हणाले. तसेच केरळ विधानसभेचे अधिवेशन 8 सप्टेंबरपर्यंत चालणार असून त्यानंतर 10 सप्टेंबरला देवन चेन्नईला जाऊन विजय यांची भेट घेणार आहे. या बैठकीनंतर त्यांच्या आगामी राजकीय कारकि‍र्दीबाबत स्पष्टता येईल.