तीन बहिणी, भाऊ आणि भाचा… एकाच कुटुंबातील पाच जणांनी जीवन संपवलं, अमरावतीमध्ये नक्की काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावतीमधील एका विश्रामगृहाच्या खोलीत एकाच कुटुंबातील पाच सदस्यांनी गळफास लावून सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी असलेल्या ‘वडेरा सत्रम’ या विश्रामगृहाच्या एका खोलीत दोन पुरुष आणि तीन महिलांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. खोलीतील पंख्याला दोन पुरुषांचे मृतदेह लटकलेले होते, तर तीन महिलांचे मृतदेह बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. या सर्वांनी सुमारे तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी बंद खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता हा संपूर्ण प्रकार समोर आला. पल्लापू सुधाकर (५०), गोगुला आदिलक्ष्मी (३६), मल्लेश्वरी (४५), श्रीदेवी (३३) आणि मणिकंठा (१५) अशी मृतांची नावे आहेत. मणिकंठा हा मल्लेश्वरी यांचा मुलगा होता. हे सर्वजण श्री सत्य साई जिल्ह्यातील बत्तलापल्ली गावचे रहिवासी होते.

घटनेची माहिती मिळताच आत्मकूरचे डीएसपी रामंजनेयुलू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब २८ जुलै रोजी ऑटो-रिक्षाने श्रीशैलम येथे आले होते. त्यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक ११ घेतली होती, ज्याचे दैनिक भाडे २९ रुपये होते. विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खोली रिकामी करण्यास सांगितले असता, त्यांनी तब्येत ठीक नसल्याचे आणि मंदिरात नवस फेडायचा असल्याचे कारण सांगत अधिक मुदत मागून घेतली होती.

प्राथमिक तपासात हे कुटुंब मोठ्या आर्थिक अडचणीत असल्याचे समोर आले आहे. मृत तीन बहिणींपैकी दोघींचा घटस्फोट झाला होता, तर सुधाकर अविवाहित असून तो आपल्या बहिणींचा सांभाळ करत होता. आर्थिक विवंचनेला कंटाळूनच या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीशैलम येथील शासकीय रुग्णालयात पाठवले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.