महागाईने कंबरडे मोडले; साखरेनंतर कांदाही आवाक्याबाहेर, काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसने सोमवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘अच्छे दिन’ आणल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीयांनी वाढत्या महागाईत घरखर्च कसा भागवायचा, याचे उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली.

जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर एक बातमी शेअर करत साखरेप्रमाणेच आता कांद्याच्या दरातही मोठी वाढ होत असल्याचे म्हटले आहे. नाशिक बाजारात केवळ एका महिन्यात कांद्याच्या किमतीत सुमारे ७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर काही राज्यांमध्ये कांद्याचे घाऊक दर दुप्पट झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावरील आर्थिक भार आणखी वाढला आहे, असे रमेश म्हणाले.

“मोदी सरकारच्या काळात आज महागाई गगनाला भिडली आहे. एका बाजूला बेरोजगारी आहे, तर दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्याही जात आहेत. त्यात महागाईचा बॉम्ब सातत्याने फुटत आहे,” असा आरोप रमेश यांनी केला.

साखरेनंतर आता कांदाही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे त्यांनी म्हटले. एका महिन्यात कांद्याच्या किमतीत ७६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून काही राज्यांमध्ये घाऊक दर दुप्पट झाले आहेत. त्याचवेळी सरकारचा बफर स्टॉकही रिकामा असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे. दूध, खाद्यतेल, फळे आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढत असल्याने सामान्य नागरिकांसाठी रोजचा खर्च भागवणे कठीण होत असल्याचे रमेश यांनी म्हटले.

“अच्छे दिन आणल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीयांनी आपला घरखर्च कसा भागवायचा, हे स्पष्ट करावे,” अशी मागणी त्यांनी केली.