डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाची हत्या करणाऱ्याला मिळणार 10 लाख डॉलर्सचे बक्षीस, इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून व्हिडीओ प्रसारित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाल्याने आखातातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. अमेरिकेच्या लष्करी कारवाईमध्ये इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी मारले गेल्यानंतर दोन्ही देशात तणाव आणखी वाढला. आता इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर एक व्हिडीओ प्रसारित झाला आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा धाटका मुलगा बॅरन ट्रम्प याच्या हत्येसाठी उकसावण्यात येत आहे.

बॅरन ट्रम्प याच्या हत्येसाठी 10 लाख डॉलर्स (जवळपास 96 कोटी रुपये) बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यापूर्वी अमेरिकेच्या प्रथम महिला मेलोनिया ट्रम्प यांना धमक्या आल्या होत्या. मात्र, त्यांचा धाकटा मुलगा बॅरन ट्रम्प याला अशा प्रकारे उघडपणे आणि सार्वजनिक व्यासपीठावरून लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे, असे वृत्त सीएनएनने दिले आहे.

आयआरआयबी या इराणच्या सरकारी वृत्त वाहिनीवर गेल्या आठवड्यात जवळपास 3 मिनिटांचा हा व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओची सुरुवातच बॅरन ट्रम्प याची हत्या कुठे करावी? अशा इंग्रजी भाषेतील धक्कादायक ग्राफिक्सने होते. व्हिडिओमध्ये बॅरन ट्रम्प ज्या सार्वजनिक ठिकाणी वारंवार जातो किंवा वेळ घालवताो, त्या ठिकाणांचे विशेष ग्राफिक्स आणि नकाशे दाखवण्यात आले आहेत. यामध्ये न्यू यॉर्कमधील प्रसिद्ध ट्रम्प टॉवरचा प्रामुख्याने समावेश आहे.

व्हिडिओच्या शेवटी निवेदकाने आमचे 10 लाख डॉलर्सचे बक्षीस मिळवण्यासाठी लोक अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहेत, असेही म्हटले. विशेष म्हणजे आयआरआयबी ही वृत्तवाहिनी इराण सरकारच्या कट्टरपंथी गटांचे समर्थन करणारी मानली जाते आणि या प्रसारक संस्थेच्या प्रमुखाची नियुक्ती थेट इराणच्या सर्वोच्च नेत्यांद्वारे केली जाते.

इराणकडून माझ्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा खळबळजनक दावा

दरम्यान, इराणी वाहिनीवरील या व्हिडिओनंतर अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. यूएस सीक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते नॅट हेरिंग यांनी यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. आम्हाला या प्रसारित व्हिडिओची पूर्ण माहिती आहे. आमच्या सुरक्षेत असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या प्रत्येक घटकाची आणि माहितीची आम्ही अत्यंत गांभीर्याने चौकशी करतो. सुरक्षेच्या कारणास्तव आणि ऑपरेशनल सिक्यूरिटी लक्षात घेता, आम्ही गुप्तचर यंत्रणांच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर उघडपणे चर्चा करत नाही, असे हेरिंग म्हणाले.