Nanded News – असना पुलावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड-नागपूर महामार्गावरील असना पुलाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अर्धापूर येथील किरण सुरेश वंटणकर (22) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा चुलत भाऊ कल्याण सुरेश वंटणकर हा गंभीर जखमी झाला आहे. किरणच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. वंटणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अर्धापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैदू गल्ली अर्धापूर शहरातील रहिवासी असलेले किरण आणि कल्याण हे दोघे आपल्या दुचाकीवरून नांदेडहून अर्धापूरच्या दिशेने जात होते. असना पुलावर आल्यानंतर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या धडकेत दोघेही महामार्गावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच नरेंद्रचार्य संस्थान रुग्णवाहिकेचे चालक राजू पाचंगे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती किरण वंटणकर याला मृत घोषित केले. गंभीर जखमी कल्याण वंटणकर याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.