
इराणने आपल्या एका मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला आहे. या दाव्यामुळे आखातातील संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
इस्रायलच्या ‘चॅनेल 14’ या वृत्तवाहिनीला दूरध्वनीवरून दिलेल्या मुलाखतीत बोलताना बेंजामिन नेतन्याहू यांनी हा दावा केला. एक अत्यंत गंभीर आणि कल्पनेपलिकडची गोष्ट घडली आहे. इराणने माझ्या एका मुलाला थेट लक्ष्य केले असून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला आहे, असा आरोप नेतन्याहू यांनी केला.
दरम्यान, इराणने हा हत्येचा प्रयत्न कधी, कसा आणि कोणत्या ठिकाणी केला, याबद्दल नेतन्याहू यांनी मुलाखतीत कोणताही सविस्तर तपशील दिलेला नाही. तसेच इराणच्या निशाण्यावर त्यांचा मोठा मुलगा याइर होता की लहान मुलगा अव्नेर हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच अधिकाऱ्यांना या हत्येच्या प्रयत्नाची माहिती कशी मिळाली याबाबतही माहिती समोर आलेली नाही.
सुरक्षेच्या खर्चाबाबत प्रश्न विचारताच आरोप
नेतन्याहू यांच्या कुटुंबाला पुरवण्यात येणाऱ्या कडक सुरक्षेवरून आणि त्यावर होणाऱ्या सरकारी खर्चावरून सध्या इस्रायलमध्ये मोठा राजकीय वाद सुरू आहे. निवडणुकीत पराभव झाला तरीही नेतन्याहू यांच्या पत्नी आणि मुलांना पुढील पाच वर्षे इस्रायलची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा शिन बेटकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे. याबाबतही नेतन्याहू यांनी भाष्य केले.
“माझ्या कुटुंबाला मिळणारी सुरक्षा हा काही विलासीपणा किंवा चैनीचा भाग नाही. जर ही सुरक्षा नसती, तर इराण त्यांच्या दुष्ट हेतूत यशस्वी ठरला असता. राजकीय आणि निवडणुकीच्या काळात सर्वांनी संयम बाळगण्याची गरज आहे”, असे बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.
दरम्यान, नेतन्याहू यांना याइर आणि अव्नेर ही दोन मुले आहेत. याइर 2024 पासून अमेरिकेतील मियामी (फ्लोरिडा) येथे राहत आहे. तेथेही त्याला शिन बेटची विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. तर त्यांचालहान मुलगा अव्नेर मुख्यत्वे इस्रायलमध्येच वास्तव्यास असतो.



























































