‘दृश्यम: द कन्क्लुजन’नंतर विजय साळगावकरची कथा संपणार? चाहत्यांना पडला मोठा प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजय देवगणच्या बहुचर्चित ‘दृश्यम 3’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदी ‘दृश्यम’चा तिसरा भाग आता ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘दृश्यम’ची ही कथा खरंच तिसऱ्या भागासोबत संपणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ हे अधिकृत शीर्षक आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. तब्बू आणि श्रिया सरन यांच्यासोबत जयदीप अहलावत यांचाही चित्रपटात महत्त्वाचा सहभाग आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करत आहेत.

चित्रपटाच्या शीर्षकातच ‘द कन्क्लुजन’ अर्थात ‘समारोप’ असा उल्लेख असल्याने हा भाग विजय साळगावकरच्या कथेचा शेवट ठरणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, निर्मात्यांनी हिंदी फ्रँचायझीचा चौथा भाग होणार नाही, अशी अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार शीर्षकावरून हा भाग कथेचा निर्णायक टप्पा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मल्याळम ‘दृश्यम’ बाबत मोठी बातमी समोर आली आहे. मोहनलाल यांचा ‘दृश्यम 3’ नंतर, आता निर्माते अँटनी पेरुंबावूर यांनी ‘दृश्यम 4’ बनणार असल्याची पुष्टी केली आहे. आधीच मोहनलाल यांनी ‘दृश्यम 3’च्या प्रमोशनदरम्यान फ्रँचायझी चौथ्या आणि कदाचित पाचव्या भागापर्यंत जाऊ शकते, असे संकेत दिले होते. त्यांनी प्रेक्षकांनी तिसरा भाग पाहून पुढील कथा हवी आहे की नाही, हे ठरवावे, असे म्हटले होते. मल्याळम आवृत्तीचा चौथा भाग निश्चित झाल्यामुळे आता हिंदी ‘दृश्यम’च्या भवितव्याबाबतही उत्सुकता वाढली आहे. अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ हा मल्याळम कथेपेक्षा किती वेगळा असेल, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

आता अजय देवगणच्या ‘दृश्यम: द कन्क्लुजन’मध्ये विजय साळगावकरच्या कुटुंबाची कथा नेमक्या कोणत्या टप्प्यावर पोहोचते आणि हा खरोखरच अंतिम अध्याय ठरतो का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.