
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र स्वयंभू श्री क्षेत्र मार्लेश्वरकडे जाणाऱ्या देवरूख-मार्लेश्वर रस्त्याला कोणी वाली आहे का? हे विचारण्याची वेळ आली आहे. याचे कारण या रस्त्याची मुसळधार पावसामुळे तसेच अवजड वाहनांमुळे प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग झोपी गेलाय का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक, भाविक व वाहनचालकांमधून विचारला जात आहे.
सध्या श्रावण महिना सुरू असून मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मार्लेश्वर तीर्थक्षेत्री येत आहेत. मात्र त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. स्वयंभू मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी व येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक व पर्यटक मार्लेश्वर तीर्थक्षेत्री येत असतात.
सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मार्लेश्वर तीर्थक्षेत्री येत आहेत. मात्र मार्लेश्वर तीर्थक्षेत्राकडे जाणारा रस्ता सध्यस्थितीला खड्डेमय बनला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मुरादपूर ते मार्लेश्वर रस्त्याचे डांबरीकरण २०२३ साली करण्यात आले होते. मात्र सध्यस्थितीला मार्लेश्वर तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मारळ ते कळकदरा दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याच्या कामासाठी मार्लेश्वर तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या मार्गावरून अवजड डंपर धावत असल्याने देवरूख-मार्लेश्वर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
या मार्गावरील आंगवली येथील दिवणमळा याठिकाणी मोरीजवळ तर रस्ता खचला असून मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी या खड्ड्यात वाहने जोरदार आपटली जात आहेत. एवढेच नव्हे तर याठिकाणी अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. निवेखुर्द येथील निंबेरा पुलाजवळही वळणावर मोठा खड्डा पडला असून याठिकाणीही रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही.
खराब रस्त्यामुळे गाड्या घसरून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांमधून केला जात आहे. तसेच या मार्गावर झाडी वाढल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. मार्लेश्वर तीर्थक्षेत्र हे राज्य शासनाने ‘क’ वर्गाचे पर्यटन स्थळ घोषीत केले आहे. मात्र या तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. हे नक्कीच भूषणावह नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याची दुरूस्ती करावी व भाविक तसेच वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.




























































