
महिला आरक्षणाचे बिल 2023 सालीच मंजूर झालेलं आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हातभर मोठे ट्विट करत मोदींचे कौतुक केले होते. आता ते बिल परत आणून कुणाला मुर्ख बनवताय? भाजप, मोदी आणि अमित शहा हे महिला आरक्षणाच्या बाबतीत ढोंग, नौटंकी, खोटारडेपणा करत आहेत”, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
”महिला आरक्षणाबाबत दुटप्पी कोण वागतंय हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला विचारायला हवा. फडणवीस आता केंद्रात जाणार आहेत त्यामुळे त्यांनी अभ्यास करायला हवा. केंद्रात काय घडलंय, नाही घडलंय याबाबत त्यांना सजगता दाखवावी लागेल. महिला आरक्षणाच्या बिलाला कुणीही विरोध केलेला नाही. महिला आरक्षणाच्या बाबतीत ढोंग, नौटंकी, खोटारडेपणा करत असेल तर भाजप, मोदी आणि अमित शहा. 2023 साली फडणवीसांनी एक ट्विट केलं होतं महिला आरक्षण बिल मंजूर झालं याचं कौतुक केलं होतं. तेच बिल परत आणून कोणाला मुर्ख बनवताय? स्वत: फडणवीसांनी हातभर ट्विट केलं होतं. फक्त ढोल ताशे वाजवायचे बाकी होते. 2023 ला महिला आरक्षण बिल मंजूर झालं आहे. आम्ही त्या बिलाची अंमलबजावणी करायला सांगत आहोत. पण त्या बिलामध्ये आता त्यांनी डिलिमिटेशन बिल घुसवलं आहे. एक बिल दोनदा कसं मंजूर होणार? ते अवतारी पुरुष प्रधानमंत्री आहेत, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात ना, काही कळतं का? कानातले बोळे काढा, नजर स्वच्छ करा. चष्मा तपासून घ्या, सरकारी हॉस्पिटलमध्ये ENT सर्जन नसतील तर आम्ही पाठवतो. वेड लागलंय त्यांना, खोटं बोलायचं, हा मुर्खपणा आहे. हे बिल २०२३ ला मंजूर झालं आहे. त्यावेळी हे मोदींशिवाय कुणी करूच शकत नाही अशा प्रकारचं ट्विट फडणवीसांनी केलं होतं”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
”देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत. नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्यचा पुरावा आणून दिला तर मी राजकारण सोडेन. मोदी ज्या काळात रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते सांगतायत तेव्हा ते रेल्वे स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. 71 सालाच्या आसपास ते स्टेशनच नव्हतं. मोदींच्या या दंतकथा आहेत. त्यांच्या ज्या बाललीला आहेत त्यातली ही एक चहा विकण्याची लीला आहे. मोदी अवतारी पुरुष आहेत, नॉन बायोलॉजिकल पुरुष आहेत मग ते चहा विकायला कशाला जातील? मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी आहेत तर चहा कशाला विकतील? फडणवीस खोटं बोलतात. फडणवीस म्हणतात की ते सामान्य कुटुंबातून आले आहेत. या देशातले अनेक राज्यकर्ते सामान्य घरातून आलेले आहेत. फक्त फडणवीसच नाही? आपण नगरसेवक देखील होणार नाही असे तुम्हाला वाटलेले असताना या महाराष्ट्राने तुम्हाला मुख्यमंत्री केलं आहे. त्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे आभारी असायला हवे पण तुम्ही महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाला आहात, सूडाने वागताय, धर्मा धऱ्मात द्वेष निर्माण करतायत. खोटं बोलताय, जो माणून सामान्य घरातून येतो तो असं वागत नाही”, असे संजय राऊत यांनी फडणवीसांना सुनावले.
























































