2012 ला ज्या जागी मोदी होते आता त्या ठिकाणी राहुल गांधी आहेत – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिल्ह्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयाला लागलेल्या आगीत तीन बालकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याबाबत बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

”राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या घटनेसाठी देखील आता राहुल गांधी, पंडित नेहरूंमुळे झालं असं म्हणणार आहेत का? तुमचं राज्य रसातळाला गेलेलं राज्य आहे. आरोग्य, रस्ते एकही खातं व्यवस्थित चालत नाहीये. मुलं जळली जातायत, खड्ड्यात पडून लोकं मरतायत आणि तुम्ही राहुल गांधींशी स्पर्धा करताय. ती तुम्हाला शक्य नाही. राहुल गांधी खूप पुढे निघून गेले आहेत. 2012 ला ज्या जागी मोदी होते आता त्या ठिकाणी राहुल गांधी आहेत. कालचा इव्हेंट पेड इव्हेंट होता, त्या इव्हेंटसाठी कोट्यवधी रुपये कुणी खर्च केले? वाटाणावाला नागपूरचा ठेकेदार पागारिया तो हा खर्च करतो सगळे, म्हणून त्याला शालेय भोजनाचे कॉन्ट्रॅक्ट मिळतायत. शालेय पोषण आहारात मुलांना अत्यंत निकृष्ठ दर्जाचे जेवण मिळतेय. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले.

”न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केलेलं विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. कुंभमेळ्याच्या खर्चाचा एक टक्का म्हणजे 35 ते 38 कोटी खर्च केले तर मराठी शाळा वाचतील असं त्यांचं म्हणनं आहे. कुंभमेळ्याचा खर्च 45 हजार कोटींच्या वर गेला आहे. त्यातले फारतर दहा ते पंधरा हजार कोटी खर्च होणार. बाकीचे ठेकेदारांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या खिशात जाणार आहेत. फक्त दलालीत 27 कोटी मंत्र्याच्या जावयाच्या खिशात गेले. चंपत रायच्या जावयाच्या खिशाल गेले. पण या सगळ्याला न्यायालय देखील जबाबदार आहे. भ्रष्टाचाराचे खटले निकालीच काढले जात नाहीत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.