
<< नीलेश कुलकर्णी
[email protected]
पश्चिम बंगालमधील विजयामुळे राजकीय महत्त्वाकांक्षेचे वारू हवेत गेलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ‘तारे’ गेल्या काही दिवसांत ‘जमी पर’ आले आहेत. सुरुवातीला ‘जंतर मंतर’वरच्या आंदोलकांनी अमितभाई नावाची ‘दहशत’ संपवली. त्यानंतर विरोधकांनी त्यांना सळो की पळो करून सोडले. त्यात भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून अमितभाईंच्या अनेक ‘आवडत्यां’ना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे, तर अनेक ‘नावडत्यां’चे पुनरागमन झाले आहे.
‘भाजपची मातृसंस्था’ असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात व्यक्ती व पक्षापेक्षा ‘संघटन’ हे अधिक महत्त्वाचे असे एकेकाळी मानले जायचे. मोदी यांच्या उदयानंतर संघ व्यक्तीपूजेमागे फरफटत गेला व संघटन दुय्यम ठरले. त्याचे भीषण परिणाम केवळ संघ व भाजपच नाही तर देश भोगतो आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर सरसंघचालक मोहनराव भागवतांनी ‘जेन झी’शी संवाद साधून सूचक इशारा देत विद्यार्थ्यांशी संवाद साधा असे सांगितले आणि तिथूनच अमित शहा यांच्या राजकीय घसरणीला सुरुवात झाली. मोदी हा ‘मुखवटा.’ मात्र प्रत्यक्षात सरकार व पक्ष हे अमित शहाच चालवतात, असा समज होता आणि आहे. त्यात काही अंशी तथ्यही आहे. मात्र आता ही स्थिती बदलेल, अशी चिन्हे आहेत. मोदींनंतर पंतप्रधान कोण? ही शर्यत सध्या भाजपमध्ये दिल्लीत सुरू आहे.
बिहारमधले नितीन नबीन अचानकपणे सुरुवातीला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष व नंतर अध्यक्ष झाले. त्यांची निवड झाल्यानंतर नितीन नबीन हे सर्वाधिक ‘गुगल’ झालेले नाव. सहा महिने झाले तरी या नबीन यांच्या कार्यकारिणीचा पाळणा काही केल्या हलत नव्हता, तो अखेर ‘जंतर मंतर’वरच्या आंदोलनानंतर हलला. 65 जणांच्या जे. पी. नड्डांच्या टीममधून फक्त 14 जणांना पुन्हा संधी मिळाली आहे, तर 51 जणांना पहिल्यांदाच कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे. भाजपअंतर्गत राजकारणात अमित शहा हे स्मृती इराणींना नेहमीच पाण्यात पाहतात. स्मृती यांच्या राजकीय विजनवासास शहा हेच जबाबदार असल्याचे सर्रास बोलले जाते. याच स्मृती यांनी शहा यांच्या नाकावर टिच्चून झोकात राजकीय पुनरागमन केले आहे. हे सूचक मानावे लागेल. शहा यांच्या ‘गूडबूक’मधील भूपेंद्र यादव, अरुणसिंग, दुष्यंत गौतम, तरुण चूघ या सरचिटणीसांचा पत्ता साफ झाला. शहा यांनी मोठे प्रयत्न करूनही कैलाश विजयवर्गीय या त्यांच्या खास समर्थकाला ते कार्यकारिणीमध्ये आणू शकले नाहीत, हे वास्तव आहे. राम माधवांना पुन्हा भाजपमध्ये पाठवून तसेच बी. एल. संतोष यांच्याबद्दल मोदी-शहांच्या मनात असंतोष असतानाही त्यांना पुन्हा संघटनमंत्री म्हणून जबाबदारी देऊन नागपूरकरांनी दांडपट्टा चालविल्याचे दिसून येत आहे. शहा यांच्या मर्जीनुसार निर्णय आता भाजपमध्ये होत नाही, हा मोठा संदेश यातून गेला आहे. वास्तविक, दतियामध्ये शहा यांचे खंदे समर्थक असणाऱ्या नरोत्तम मिश्रांचे तिकीट कापले गेले, त्याच वेळी शहा यांच्या राजकीय घसरणीला सुरुवात झाली होती. बंगालमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला त्याचे श्रेय अमित शहा यांना दिले जाते. मात्र त्यांच्या ‘अतिमहत्त्वाकांक्षेचा वारू’ ज्या पद्धतीने इंद्रप्रस्थाच्या राजगादीकडे आगेकूच करत होता. त्या वारूला यमुनेच्या तटावरच ‘लगाम’ घालण्यात आला आहे हे नक्की!
जेन झी व महिलांचे काय?
‘जंतर मंतर’वरील आंदोलनानंतर ‘जेन झी’चा धसका घेतलेल्या भाजपने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जेन झीला पुरेसे प्रतिनिधित्व दिले जाईल, तसेच महिलांनाही पक्ष संघटनेत 33 टक्के आरक्षण दिले जाईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात हा नेहमीप्रमाणे फुसका बार ठरला. नबीन हे 46 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांची टीम तरुण असेल असे सांगितले गेले. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या टीममध्ये सर्वात युवा असणारे युवा मोर्चाचे अध्यक्ष हेमांग जोशी हे 35 वर्षांचे आहेत, तर सर्वाधिक 73 वर्षांच्या वसुंधरा राजे या उपाध्यक्ष आहेत. नबीन यांच्या टीममध्ये जेन झी म्हणजेच 29 वर्षांखालील एकही प्रतिनिधी नाही. भाजपमध्ये संघटनमंत्री, सहसंघटनमंत्री व महासचिव ही पदे महत्त्वाची मानली जातात. या पदावर एकही जेन झी नाही. तीच बाब महिलांची. महिलांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देऊन एक अनोखे उदाहरण पेश केले जाईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात 65 जणांच्या कार्यकारिणीत केवळ 12 महिला आहेत. त्यातील निम्म्या महिला या भाजपच्या पक्षसंघटनेत फारसे महत्त्वाच्या नसलेल्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवडलेल्या आहेत. केवळ स्मृती इराणी या एकमेव महासचिव आहेत. त्यामुळे जेन झी व महिला सबलीकरण हे भाजपचे नुसते तोंडाचे बुडबुडे आहेत, हेच यानिमित्ताने सिद्ध झाले आहे.
मालवीयांचे पुढे काय?
2014 मध्ये सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची, वैयक्तिक चारित्र्यहनन करायचे, शिंतोडे उडवायचे व त्या पद्धतीचे ‘नरेटिव्ह’ सेट करायचे, ही ‘ट्रोल फॅक्टरी’ उघडणाऱ्या अमित मालवीय यांना अखेर भाजपच्या आयटी सेलमधून नारळ देण्यात आला. मालवीय हे कोणी फार थोर वगैरे पुढारी नव्हेत. मात्र, आयटी सेलच्या माध्यमातून विरोधकांना घायाळ करण्यात त्यांचे फंडे सुरुवातीला यशस्वी ठरले. सत्ताधारीच असे टार्गेट करत असल्याने सुरुवातीला विरोधक गांगरून गेले. सोशल मीडियात अनेक ग्रुप बनवून अशी ‘बदनामीची फॅक्टरी’ जोरात सुरू झाली. काळ पुढे गेला. या फॅक्टरीला प्रत्युत्तर देण्यासाठी समाजातील विद्वान लोक पुढे येऊ लागले. विरोधी पक्षांनीही जशास तशी उत्तरे द्यायला सुरुवात केली. मात्र, मालवीय यांच्या या बदनामीच्या फॅक्टरीला ‘शेरास सव्वाशेर’ असा गुरू मिळाला तो म्हणजे ‘कॉक्रोच!’ पंतप्रधान मोदी यांनी जेन झीला उद्देशून इन्स्टावर एक व्हिडीओ टाकला. त्यावर आलेल्या कॉमेंटस्नी सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. जगात जितक्या भाषा नसतील तितक्या भाषेत पंतप्रधानांवर शेलक्या शब्दांत टीका करण्यात आली. अर्थात या टीकेचे समर्थन कोणी करणार नाही, पण बदनामीच्या फॅक्टरीवर हे ‘बूमरँग’ झाले. सोशल मीडियावरचे पंतप्रधानांचे ट्रोलिंग इतके खतरनाक होते की त्यातून अजूनही सत्ताधारी सावरलेले नाहीत. जेन झीनी जो काही तडाखा दिला त्याला सामोरे कसे जायचे, याचा विचारही अमित मालवीय करू शकले नाहीत. भाजप व केंद्र सरकारबद्दल भाजपच्या आयटी सेलमुळे घृणा निर्माण झाली आहे, हे लक्षात आल्यानंतर तातडीने मालवीय यांना नारळ देण्यात आला आहे. मात्र मालवीय यांचे राजकीय महत्त्व लगेचच संपेल, या भ्रमात कोणी राहू नये. मालवीय हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचे सहप्रभारी होते. थोडी धूळ खाली बसली की मालवीय यांचे पुनर्वसन होईलच.

























































