अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयात अग्नीतांडव; 3 नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये (एनआयसीयू) सोमवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये एनआयसीयूमध्ये उपचार घेत असणाऱ्या 3 नवजात बालकांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे अमरावती शहरासह महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास एनआयसीयू वार्डामध्ये अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण वॉर्डात धुराचे लोट पसरले. आग लागताच कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ बचावाकार्य सुरू केले. कर्मचाऱ्यांनी धुराच्या लोटातून एनआयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यास सुरुवात केली, मात्र दुर्दैवाने आग आणि धुराच्या विळख्यात अडकल्यामुळे तीन बालकांचा मृत्यू झाला.

6 बालकांची प्रकृती चिंताजनक

आग आणि धुराच्या विळख्यातून वाचवण्यात आलेल्या बालकांपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या स्फोटामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच हा विभाग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्विय का झाली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मध्य प्रदेशातील घटनेची पुनरावृत्ती

दोनच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये वॉर्मर मशिनला आग लागली होती. या आगीमध्ये होरपळून एका नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. प्रशासनाकडून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा आणि उपकरणांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मध्य प्रदेशात रुग्णालयातील कार्डल वॉर्मरला आग, एका नवजात बाळाचा मृत्यू