
बारामतीमधील रुई येथील साई गणेशनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमसह पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले.
आमदार रोहित पवारांनी पोलिसांची आणि डॉक्टरांची भेट घेतली. प्राथमिक माहितीनुसार मुलीने आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडील रागावल्याने मुलगी घरातून निघून गेली होती. बराच वेळ शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे तिचे पालक नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात आले होते. मुलीच्या पालकांसह पोलिसांनी शोध घेतला; परंतु मुलगी मिळून आली नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.





























































