
शिवसेनेसाठी सातत्याने कार्यरत राहून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी निष्ठावंत राहणाऱ्या महाड विधानसभेतील दासगाव जिल्हा परिषद आणि विन्हेरे जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला. मशालीचे तेज गावागावात पसरेल असे सांगतानाच शहरापासून गावापर्यंत शिवसैनिकांशी समन्वय राखत विविध उपक्रम राबवून संघटनेला बळकट करण्याचा निर्धारही शिवसैनिकांनी केला. यावेळी आवाज कुणाचा.. शिवसेनेचा अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दासगाव आणि विन्हेरे जिल्हा परिषद मतदारसंघातील मुंबईनिवासी निष्ठावंत शिवसैनिकांचा भव्य मेळावा आणि सन्मान सोहळा आणि कार्यकर्ता आढावा बैठक दादर येथील पर्ल सेंटर सभागृहात प्रचंड गर्दीत आणि उत्साहात पार पडला. यावेळी महाड विधानसभेचे सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत धोंडगे यांनी मार्गदर्शन केले.
पक्षासाठी सातत्याने आणि निष्ठेने कार्यरत असलेल्या सुदाम वाडकर, प्रदीप साळवी, सागर शिंदे, गणेश झोरे, अमोल पवळेकर, सूरज नामुगरे, समर जाधव, रूपेश शिंदे तसेच वैद्यकीय विभागात उल्लेखनीय कामगिरी करणारे नितीन चाळके यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तीना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संयुक्त प्रतिमा आणि शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.
गणेशोत्सव काळात पक्षाचे उपक्रम गावागावात राबवणार
कोकणी माणूस हा शिवसेनेशी सदैव निष्ठावंत आहे, असे सांगतानाच आगामी काळात विविध उपक्रम राबवून पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी कटिबद्ध रहा, असे आवाहन महाड विधानसभेचे सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत धोंडगे यांनी केले. गौरी-गणेशोत्सवात असंख्य चाकरमानी गावाला जातात. यावेळी विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी झालेल्या आढावा बैठकीत करण्यात आला. आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक वेग मिळेल, असा विश्वासही यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त केला.






























































