
<< विनायक
पृथ्वीवर 70 टक्क्यांहून अधिक समुद्राचं पाणी आहे याचा अर्थ पृथ्वीच्या पृष्ठभागावरून दिसणाऱ्या जलपृष्ठाचा हा हिशेब आहे. समुद्रांच्या खोल तळाशी पुन्हा भूमीच आहे, परंतु आपल्याकडे ‘पृथ्वीव्यै समुद्रपर्यन्ता’ ही जी संकल्पना आहे ती ‘जिथे सागरा धरणी मिळते’ अशा स्वरूपाची आहे. आपलं पृथ्वीवरचं एकूण सागरी पाणी घन किलोमीटरमध्ये मोजायचं तर ते 1.300 अब्ज घन किलोमीटर भरेल. त्यामध्ये पृथ्वीवरचं सुमारे 97 टक्के जल सामावलेलं आहे. हे पाणी अतिशय खारट असून त्याचं प्रमाण साधारणपणे प्रतिलिटर 35 ग्रॅम आहे. अर्थात या सागरजलातील 96.5 टक्के पाणी ‘गोड’ असून मिठाचं प्रमाण अवघं अडीच ते साडेतीन टक्के इतकंच आहे.
बाकी समुद्राचा व्यापक परिणाम वादळं तसेच पाण्याची वाफ होऊन पडणारा पाऊस, सागरपृष्ठावरील पाण्याच्या कमी-अधिक तापमानानुसार जाणवणारे ‘एल निनो’ किंवा ‘ला निना’ असे परिणाम अथवा ‘इंडियन डायपोल’सारखा प्रभाव या गोष्टी गेल्या काही महिन्यांत चर्चेत आल्या. यावर्षी ‘एल निनो’ बहुतेक महादुष्काळच आणेल अशा शक्यता वर्तवल्या जात असतात. आपल्या देशात जून कोरडा गेला तरी जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस चांगला झाला. निसर्गाची पुढची लहर काय, त्याचा अंदाज बांधणंही किती कठीण असतं हेच यावरून दिसलं. समुद्र म्हटला की, सूक्ष्म शैवालापासून ब्लू व्हेलसारख्या पृथ्वीवरच्या सर्वात महाकाय माशापर्यंत लाखो जीव-वनस्पती यांचं स्मरण होतं. मोती-पोवळी अशा पारंपरिक मौल्यवान वस्तू आणि आधुनिक काळातलं सर्वात मौल्यवान खनिज तेलही सर्वाधिक प्रमाणात सागरच देतो.
समुद्राचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘जिऑइड’. याला मराठीतला वैज्ञानिक पर्याय ‘भूगोलाभ’ असा आहे. काहीच माहिती नसेल तर दोन्ही शब्दांचा बोध होणं कठीण आणि काहीसं किचकटही, परंतु या लेखात या ‘जिऑइड’ सागरी परिणामाचं स्वरूप जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर आधारित असा सागरपातळीचं मापन करण्याचा प्रकार पृथ्वीचा खरा भौमितिक आकार दाखवतो. ‘भूगोलाभ’ किंवा ‘जिऑइड’ हा त्या आकाराचा आणि तेथील विविक्षित ठिकाणच्या गुरुत्वाकर्षणाचा पाण्यावर होणारा परिणाम. त्यातून सिद्ध होतं, पृथ्वी हा ग्रह गुळगुळीत गोल चेंडू नसून उंचसखल पृष्ठभागाचा तो ध्रुव भागांकडून चपटा आणि विषुववृत्ताजवळचा फुगीर गोल आहे.
म्हणूनच ‘जिऑइड’ म्हणजे सागरपृष्ठाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने मिळालेला आकार. पृथ्वीवरच्या समुद्राला येणारी भरती-ओहोटी आणि त्यातील वादळांमुळे धारण केलं जाणारं प्रासंगिक उग्र स्वरूप बाजूला ठेवलं तरी सागरपृष्ठ शांत-निवांत असतानाचा आकार. सागरी पाण्याच्या या तशा ‘काल्पनिक’ आकाराची मांडणी कार्ल फ्रेड्रिक गॉस यांनी केली आणि ती पृथ्वीची ‘गणितीय आकृती’ (मॅथॅमॅटिकल फिगर) असल्याचं सांगितलं. शांत तरीही असमान (किंवा सर्वत्र सारखी सपाटी नसलेला) जलपृष्ठाचा आविष्कार म्हणजे ‘जिऑइड’. तो अतिशय काटेकोर मापनाद्वारेच समजू शकतो. गणिती असलेले ग्लॅडी वेस्ट यांनी पृथ्वीच्या उपग्रहाने घेतलेल्या प्रतिमांवरून (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमवरून) पृथ्वीवरच्या सागरांमध्ये जिऑइडचा उंचसखल प्रभाव (जिऑइड अन्डय़ुलेशन) अथवा ‘जिऑइड’च्या उंचीचं गणित मांडलं.
पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे विषुववृत्ताजवळचा भाग फुगीर आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीवर खोल समुद्र, समुद्रातील दऱ्या-डोंगर आणि भूपृष्ठावरही दऱ्या-डोंगराचा उंच-सखलपणा आहेच. भूपृष्ठावर 8800 मीटर उंचीचं जसं एव्हरेस्ट शिखर आहे तसाच पॅसिफिक महासागरात 11000 मीटर खोल दरी किंवा ‘मरिना ट्रेन्च’ आहे. हिंदुस्थानी भूमीवरची उंचसखलता + 85 ते – 106 मीटरपर्यंत विविध ठिकाणी जाते.
या तांत्रिक गोष्टी वगळता पृथ्वीवरच्या सागरांचा आकार पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती आणि गुरुत्वाकर्षण यावर अवलंबून असतो. हिंदुस्थानच्या बाबतीत सांगायचं तर ‘इंडियन ओशन जिऑइड लो’ (आयओजीएल) हा 30 लाख चौरस किलोमीटरचा ‘जिऑइड’ म्हणजे दक्षिण हिंदुस्थानी टोकाच्या खाली समुद्रातलं ‘जलविवर’च म्हणावं लागेल. त्या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण खूप कमी असून तिथला ‘भूगोलाभ’ 106 मीटर खोल जलखड्ड्यासारखा भासतो!
1948 मध्ये डच संशोधक फेलिक्स मेनेझ यांनी समुद्रातून बोट जाताना जाणवणाऱ्या गुरुत्वाकर्षणातून याचा ‘शोध’ लावला. हे जलविवर जवळ जवळ आपल्या देशाच्या आकाराचं आहे! हे ‘जलविवर’ सुमारे 350 फूट खोल (पाण्यातल्या पाण्यात) आहे. याउलट जिथे गुरुत्वाकर्षण अधिक आहे, तिथला भूगोलाभ (जिऑइड) + 85 असू शकतो. अशी स्थिती उत्तर ध्रुव प्रदेशाजवळच्या आइसलॅन्ड येथे आहे.


























































