
दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावात बुडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शेखर हरीश रावल असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, मलबार हिल पोलीस आणि महापालिकेच्या वॉर्डातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तरुणाला पाण्यातून बाहेर काढून मलबार हिल येथील एलिझाबेथ रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, शेखर हा बाणगंगा तलावावर फिरण्यासाठी गेला होता आणि पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. शनिवारी दुपारी 1.10 च्या सुमारास ही घटना घडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने शेखर बुडू लागला. स्थानिक संघटनांचे कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तरुणाला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी त्याला प्रथमोपचार देण्याचाही प्रयत्न केला. मलबार हिल पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.























































