कास पठारावर १ सप्टेंबरपासून फुलोत्सव! पर्यटकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगप्रसिद्ध पुष्पपठार आणि सातारा जिल्ह्याचे वैभव असलेल्या कास पठारावर यंदाच्या पर्यटन हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. एक सप्टेंबरपासून कासचा फुलोत्सव सुरू होत असून, पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज झाले आहे. ऊन-पावसाच्या खेळामुळे पठारावर विविधारंगी फुलांची चाहूल लागली असून, फुलांच्या बहरासोबतच यंदा पर्यटकांना निसर्गाचा नवा अनुभव देणारे आकर्षक पॉइंटही विकसित करण्यात आले आहेत. कास पठारावर प्रवेश शुल्क २०० रुपये आकारले जाणार आहेत.

वन विभाग आणि कास समितीच्या पुढाकारातून गेल्या काही दिवसांपासून पठारावर विविध विकासकामे हाती घेण्यात आली होती. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक सौंदर्याशी सुसंगत पद्धतीने उभारण्यात आलेल्या या सुविधांमुळे कासच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

कास परिसराचे वैभव असलेल्या गवा, बिबट्या, हरीण, सांबर, मोर, माकड, वानर आदी वन्यजीवांच्या प्रतिकृती स्वागतकमानी जवळ उभारण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक साहित्य आणि नैसर्गिक देखणेपण जपून करण्यात आलेल्या या कामांमुळे पर्यटकांना कासच्या निसर्गाची अधिक जवळून अनुभूती घेता येणार आहे.

यंदाचा पर्यटन हंगाम सुरळीत पार पडावा आणि पर्यटकांना सुलभपणे कासचा आनंद घेता यावा, यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पोलीस प्रशासनासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. वाहतूक, सुरक्षा, पर्यटकांच्या सुविधा आणि हंगामातील नियोजनाबाबत प्रशासनाकडून तयारी केली आहे.

मंडपघळ, दगडी कमान, भगदार तळे, वेण्णा दर्शन पॉइंट यांसारख्या नैसर्गिक ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे फुलांचा बहर पाहण्यासोबतच कास परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. त्यामुळे आता पर्यटकांना १ सप्टेंबरची ओढ लागली आहे.

२०० रुपये प्रवेश शुल्क
कास पठारावर प्रवेश शुल्क २०० रुपये आकारले जाणार आहे. त्यामध्ये पार्किंग फ्री, पार्किंग ते कास पठार बस फ्री व कास पठार फुलांची माहिती पुस्तिका देण्यात येणार आहे. कासचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी पर्यटकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पर्यटकांनी निसर्गाची हानी न करता वन विभागाला समितीला सहकार्य करावे. ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना प्राधान्य दिले जाणार असून, गर्दी होणार नाही, याचे नियोजन केले आहे, असे कास पठार समितीचे माजी उपाध्यक्ष प्रदीप कदम यांनी सांगितले.

विश्रांती कक्ष, स्वागतकमानी अन् हिरकणी कक्ष
यंदाच्या हंगामाचे वैशिष्ट्य ठरणाऱ्या नव्या सुविधांमध्ये नैसर्गिक लाकडी बांधकामाची आठवण करून देणारे विश्रांती कक्ष, आकर्षक पॅगोडा, कास तलाव व परिसराचा विहंगमय नजारा पाहण्यासाठी मनोरा, विविध ठिकाणी आकर्षक स्वागतकमानी, नैसर्गिक दगडांची कमान आणि लाल दगडी चिऱ्यांच्या आकर्षक पायवाटांचा समावेश आहे. महिलांसाठी स्वतंत्र ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आला आहे.