
जयपूरमध्ये गोठ्यात सुरू असलेल्या शाळेच्या पाहणीवरून कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) कार्यकर्ते आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला होता. गावकऱ्यांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर 24 तासांच्या आत ही शाळा गोठय़ापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या एका घरात हलविण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर राजस्थानातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
जयपूर जिल्ह्यातील रामपुरा गावात ही शाळा भरत होती. शाळेची इमारत मोडकळीस आल्यामुळे ती एका गोठय़ात भरवण्यात येत होती. गेल्या अनेक महिन्यांमध्ये इमारतीचे काम सुरूच झाले नाही. या प्रकारावर लक्ष वेधण्यासाठी आशुतोष रांका यांच्या नेतृत्वाखाली सीजेपीची टीम शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचली. मात्र, गावकऱ्यांना त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या वाहनांवर दगडफेकदेखील केली होती. या घटनेप्रकरणी गावकरी आणि सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
नव्या ठिकाणीदेखील भरउन्हात भरली शाळा
ही शाळा आज जवळच्या एका घरात हलवण्यात आली. एका गावकऱ्याने आपले घर शाळेसाठी दिले असून तेथे आधी एक किराणा दुकान होते. मात्र, नव्या ठिकाणीदेखील विद्यार्थ्यांना भरउन्हात बसावे लागले. सुमारे 16 विद्यार्थी या ठिकाणी आले होते.






























































