
चंद्राच्या ज्या भागात सूर्याचा प्रकाश कधीही पोहोचत नाही, अशा अत्यंत गडद अंधारमय आणि अतिथंड भागात पाण्याचा शोध घेण्यासाठी चीनने आपली आतापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आहे. चीनच्या अवकाश संस्थेची ‘चांग-ई 7’ ही मोहीम लवकरच चंद्राच्या दिशेने झेपावणार असून अमेरिकेच्या ‘नासा’च्या मोहिमांपेक्षा ती पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने राबवली जाणार आहे.
चंद्राच्या ध्रुवीय भागात बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचे गेल्या दोन दशकांपासून सर्वश्रुत आहे. मात्र, ते पाणी किती प्रमाणात आहे, किती खोलीवर गाडले गेले आहे आणि ते मानवी वापरासाठी खरंच बाहेर काढता येऊ शकते का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चीनची ही मोहीम अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील विवरांमध्ये सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नसल्याने तिथले तापमान उणे 200 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते. अशा दुर्गम आणि तीव्र उताराच्या विवरांमध्ये नेहमीचे चाकांचे रोव्हर पोहोचू शकत नाहीत. यासाठी चीनने या मोहिमेत एक विशेष हॉपर समाविष्ट केला आहे. हॉपर हे नेहमीच्या रोव्हरसारखे चाकांवर चालण्याऐवजी चंद्राच्या खडकाळ पृष्ठभागावर उड्या मारून थेट खोल विवरांमध्ये उतरू शकते. चीनच्या या मोहिमेत एक ऑर्बिटर, लँडर, रोव्हर आणि हॉपर यांचा समावेश आहे. मार्च 2024 मध्ये आधीच प्रस्थापित केलेला कुएच्याओ-2 हा उपग्रह या मोहिमेसाठी पृथ्वी आणि चंद्रामधील संपर्काचा मुख्य दुवा म्हणून काम करेल.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील शॅकलटन विवराजवळील उंचावरील डोंगररांगांवर हे लँडर उतरवले जाण्याची शक्यता आहे. चांग-ई 7 ही पूर्णपणे चीनच्या सरकारद्वारे नियंत्रित आणि एकाच विशिष्ट उद्दिष्टासाठी डिझाइन केलेली एकसंध मोहीम आहे. याउलट, नासा कमर्शियल ल्यूनार पेलोड सर्व्हिसेसद्वारे खासगी कंपन्यांना कंत्राट देऊन सेवा खरेदी करत आहे. नासा स्वतः लँडर बनवण्याऐवजी खासगी कंपन्यांचे अवकाशयान आणि रोव्हर वापरत आहे. अलीकडेच इन्ट्युटिव्ह मशीन्स या खासगी कंपनीची आयएम-2 अथेना मोहीम अशाच प्रयत्नाचा भाग होती, परंतु लँडर कलंडल्यामुळे ती पूर्ण यश मिळवू शकली नव्हती.
चीनची ही मोहीम केवळ पाणी शोधण्यापुरती मर्यादित नसून, चंद्रावरील संसाधनांचा प्रत्यक्ष वापर कसा करता येईल हे तपासण्याकडे टाकलेले पहिले पाऊल आहे. यानंतर 2028 मध्ये चीन चांग-ई 8 मोहीम राबवेल. पुढे चीन आणि रशियाची रोसकॉस्मॉस संस्था मिळून चंद्रावर इंटरनॅशनल ल्यूनार रिसर्च स्टेशन उभारणार आहेत. तर दुसरीकडे नासा आपल्या आर्टेमिस मोहिमेद्वारे चंद्रावर मानवाचा दीर्घकालीन मुक्काम शक्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे.




























































