Lausanne Diamond League 2026- नीरज चोप्राने जोर लावून भाला भेकला, पण 0.09 मीटरने पहिला क्रमांक हुकला; पथिरागे ठरला वरचढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉझेन डायमंड लीग स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात हिंदुस्थानचा स्टार ॲथलीट आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला अवघ्या 0.09 मीटर फरकाने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिरागेने 88.14 मीटर भालाफेकीसह प्रथम स्थान पटकावत या मोसमात नीरजला सलग तिसऱ्यांदा मात दिली. नीरजने 88.05 मीटरच्या भालाफेकीसह रौप्य पदक मिळवले, तर ग्रॅनाडाच्या अँडरसन पीटर्सने 86.69 मीटर फेकीसह तिसरे स्थान मिळवले.

पथिरागेने 2026 च्या हंगामात नीरज चोप्राविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यापूर्वी जूनमधील दोहा डायमंड लीग आणि ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पथिरागेने नीरजला मागे टाकून सुवर्णपदक जिंकले होते. लॉझेनमध्ये नीरजकडे या पराभवाचा बदला घेण्याची संधी होती, परंतु पथिरागेने मोक्याच्या क्षणी बाजी मारली.

दरम्यान, नीरजने 83.54 मीटरने सुरुवात केली. त्यानंतर नीरजने जोरदार पुनरागमन करत 88.05 मीटर भाला फेकला आणि गुणतालिकेत थेट अव्वल स्थान मिळवले. दुसरीकडे पथिरागेने लगेचच प्रत्युत्तर देत 88.14 मीटर भाला भेकला आणि पुन्हा आघाडी घेतली. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात नीरजने 83.72 मीटर भाला फेकला. चौथा प्रयत्न फाऊल ठरल्यानंतर शेवटच्या प्रयत्नात नीरज आणखी लांब भाला फेकेल अशी अपेक्षा होती. मात्र तो 82 मीटरपर्यंत भाला फेकू शकला. त्यामुळे पथिरागेच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.