
कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड (49) यांचे कर्तव्यावर असताना आपल्या पोलीस जीपमध्येच आज हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. रोजचे मोर्चे, आंदोलने, व्हीआयपी बंदोबस्त ही तणावाची कारणे जरी सांगितली जात असली तरी मुंबईतील प्रदूषणाने गंभीर पातळी गाठली आहे. त्यामुळे धुळीचे कण फुप्फुसातील रक्तात जातात, रक्त घट्ट करतात, बीपी वाढतो आणि अॅटॅक येऊन मुंबईत तासाला किमान एका तरी व्यक्तीचा मृत्यू होतो. दर एक-दोन दिवसांनी मुंबईसह महाराष्ट्रात एकातरी पोलिसाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू होतो. दरवर्षी 12 हजार अकाली मृत्यू केवळ प्रदूषणामुळे होत असल्याचे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुंबई)चे म्हणणे आहे.
आज सकाळी 9.30च्या सुमारास मुलुंड येथील घरातून निघालेले पोलीस निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड मालाड येथील कुरार पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांचे डोके दुखू लागले म्हणून ते गाडीतच झोपले. गाडी पोलीस ठाण्यात पोहोचली तरी गायकवाड उठले नाहीत. ‘‘साहेब, पोलीस ठाणे आले. उठा’’ असे वाहन चालकाने गायकवाड यांना सांगितले. गायकवाड यांनी चालकाला काहीच प्रतिसाद दिला नाही तेव्हा वाहन चालकाने गाडीबाहेर नेऊन त्यांना हलविले असता गायकवाड उठलेच नाहीत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते.
मुंबईतील प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी रोज किमान 12 ते 14 तास डय़ुटी करतो. त्या वेळी सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर त्याला रोज संघर्ष करावा लागतो. बदली करण्याची धमकी दिली जाते. याचा परिणाम पोलिसांच्या प्रकृतीवर होत आहे. बांगूर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयवंत पवार यांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नुकतेच दाखल करण्यात आले आहे.
पोलीस तणावाखाली
सर्वच पोलीस आज तणावाखाली आहेत. सत्ताधाऱयांच्या हस्तक्षेपामुळे ते पार पिचून गेले आहेत. तरीही पोलिसांचे सर्वात जास्त बळी मुंबईतील प्रदूषणाचे आहेत. मुंबईचा पोलीस रोज किमान 12 तास रस्त्यावर उभा असतो. प्रदूषणामुळे त्याची फुप्फुसे निकामी होत आहेत, परंतु सत्ताधाऱ्यांना याचे काही देणेघेणे नाही, असे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱयाने दै. ‘सामना’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. डॉक्टरांच्या मते तणाव, झोपेचा अभाव, अनियमित जेवण व प्रदूषण हे चार घटक एकत्र आले की हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो.






























































