
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱयावर हल्ला करणाऱया दोन प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश पवार आणि निकिता पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. तिकीट तपासणी कर्मचारी जिग्नेश भावसार हे 25 ऑक्टोबरला सायंकाळी सातच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्र. 5 व 6 जवळील कॉनकोर्स परिसरात तिकीट तपासणीचे काम करत होते. त्यांनी तिकिटे तपासण्यासाठी ऋषिकेश पवार व निकिता पवार या दोघांना थांबवले. यावेळी ऋषिकेशने आपण रेल्वे कर्मचारी असल्याचा दावा केला. भावसार यांनी त्याला रेल्वे ओळखपत्र किंवा नोकरीचा पुरावा दाखवण्यास सांगितले. त्यावर ऋषिकेशने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना भावसार यांच्यावर ऋषिकेशने हल्ला केला, तर निकिता हिने शिवीगाळ केली.



























































