राजस्थानी क्रीडा टॅलेंटसाठी रुईया स्पोर्ट्स अकॅडमी सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानच्या शेखावाटी भागातील तळागाळातील क्रीडा टॅलेंटला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘रामनारायण रुईया शेखावाटी स्पोर्ट्स अकॅडमी’ आकार घेत आहे. सुमारे १६ एकर परिसरात उभारली जाणारी ही अकॅडमी अत्याधुनिक बहुक्रीडा केंद्र म्हणून विकसित केली जात असून, खेळाडूंचा विकास, शिक्षण आणि निवासी सुविधांचा संगम येथे पाहायला मिळणार आहे.

या क्रीडा अकॅडमीत क्रिकेट, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, कुस्ती, बॉक्सिंग, नेमबाजीसह इनडोअर खेळांच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. भविष्यात उच्च-कार्यक्षमता निवासी कार्यक्रमांसोबत स्पोर्ट्स सायन्स, फिजिओथेरपी आणि क्रीडा ॲनालिटिक्सचीही सुविधा विकसित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, खेळाडू घडवण्याबरोबरच बी.पी.एड. आणि एम.पी.एड. अभ्यासक्रमांसह शिक्षक प्रशिक्षण संस्थेची उभारणी करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रशिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांची नवी फळी तयार होणार आहे.

शेखावाटीतील मुलींचा वाढता क्रीडा सहभाग लक्षात घेऊन त्यांनाही व्यापक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे शेखावाटी स्पोर्ट्स अकॅडमीच्या विश्वस्त अमला रुईया यांनी सांगितले. गावच्या मैदानापासून राष्ट्रीय अजिंक्यपदापर्यंत आणि स्थानिक स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय क्रीडांगणापर्यंतचा प्रवास घडवण्याचे स्वप्न या अकॅडमीने पाहिले आहे.