
प्रवाशांना स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या ‘रेलनीर’ पाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोज सरासरी चार लाख रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यातील निम्म्यांहून अधिक प्रवासी रेल्वे स्थानकावरून पाण्याची बाटली खरेदी करतात. ‘रेलनीर’च्या एका बाटलीची किंमत १४ रुपये आहे. मात्र, रेलनीरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने इतर बँडचे पाणी खरेदी करावे लागत आहे. या पाण्याची किंमत २० रुपये आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रत्येक बाटलीमागे सहा रुपये अधिक मोजावे लागत आहेत.
साधारणपणे ३१ ऑगस्टपर्यंत हा तुटवडा कायम राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. पुणे, अहिल्यानगर, कोपरगाव, दौंड आणि शिर्डी या स्थानकांवरही रेलनीरचा तुटवडा जाणवत आहे. रेलनीरचा पुरवठा नेमका कुठे अडला, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. रेल्वे स्थानकांवर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा होत असताना पाण्यासारख्या मूलभूत सुविधेचा तुटवडा निर्माण झाल्याने रेल्वे प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.
गेल्या महिन्यापासून रेलनीरचा आवश्यक पुरवठा होत नाही. त्यामुळे इतर खासगी कंपन्यांना पाणी विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. लवकरात लवकर प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून रेलनीरचे पाणी उपब्ध करून द्यावे.
चैतन्य जोशी, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती



























































