
राष्ट्रभक्तीचा बाजार मांडणे हे भाजप व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे तंत्र आहे. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून सामुदायिक ‘वंदे मातरम्’ गान केले, पण ‘वंदे मातरम्’ अवमानना विधेयक संसदेत मंजूर होत असताना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हजर नव्हते. ‘वंदे मातरम्’ सहा कडवी गाणेही सरकारने आता सक्तीचे केले. टेलिप्रॉम्प्टरशिवाय पहिली तीन कडवी यांनी गाऊन दाखवावीत. ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्य भांडवल ढोंग, असत्य, फसवाफसवी हेच आहे.
देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. देशापेक्षा हा भाजपाचाच स्वातंत्र्य दिन जास्त वाटला. देशातले सध्याचे वातावरण असे आहे की, पंतप्रधान म्हणून मोदी यांनी लाल किल्ल्यावरून शेवटचा तिरंगा फडकवला आहे अशीच लोकभावना आहे. पंतप्रधान मोदी यांच्या डोक्यात कधी एखादी सणक येईल व ते कसल्या विषयाचे राजकारण करतील ते सांगता येणार नाही. या वेळी मोदींनी लाल किल्ल्यावरून प्रथम ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगानाचा कार्यक्रम केला. त्यानंतर ध्वजारोहण व नंतर नेहमीचेच भाषण. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानास दीडशे वर्षे झाल्यानिमित्त हा उपक्रम केला. ‘वंदे मातरम्’वर आपलाच अधिकार असल्याचे मोदी व त्यांचे लोक सध्या भासवत आहेत. सत्य असे आहे की, 1896 च्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी ‘वंदे मातरम्’ गान केले. काँग्रेसच्या राष्ट्रीय मंचावरून सर्वप्रथम ‘वंदे मातरम्’ गायले, पण काँग्रेसचा ‘वंदे मातरम्’ गायनाला विरोध असल्याचा अपप्रचार भाजपने सातत्याने केला. आजही भाजप व संघाशी जोडलेले मुसलमान ‘वंदे मातरम्’चा स्वीकार करत नाहीत. पण खापर सर्व मुसलमानांवर फोडले जाते. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानास कायदेशीर संरक्षण देण्यासाठी गृहखात्याने ‘राष्ट्रीय गौरव अपमान निवारण (संशोधन) विधेयक’ संसदेत आणले. या विधेयकानुसार ‘वंदे मातरम्’ला ‘जन गण मन’इतकेच कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. ‘वंदे मातरम्’चा अपमान करणाऱ्यांना कठोर तुरुंगवास व दंडाची शिक्षा या नव्या कायद्याने होईल, पण हे विधेयक सादर करताना आणि मंजूर होताना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा संसदेच्या सभागृहात उपस्थित राहिले नाहीत. हा ‘वंदे मातरम्’चा अपमान आहे. त्याच लोकांनी लाल किल्ल्यावर वंदे मातरम् गानाचा उत्सव केला.
मोदींचा अतिरेक
मोदी यांनी दिल्लीतील पारतंत्र्याची सर्व प्रतीके नष्ट करण्याचे ठरवले आहे. ही त्यांची सणक आहे. मोदींना जुने भव्य संसद भवन हे पारतंत्र्याचे प्रतीक वाटले. त्यामुळे या ऐतिहासिक भव्य संसद भवनाला ‘टाळे’ लावून मोदींनी नवे संसद भवन (लोकशाहीचा नवा कत्तलखाना) उभारले. खरं तर जुन्या संसद भवनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आणि प्रजासत्ताकाचा इतिहास घडला. हे जेव्हा ब्रिटिश पार्लमेंट होते, तेव्हा याच पार्लमेंटवर आपल्या क्रांतिकारकांनी बाम्ब फेकले होते, पण मोदींना हा इतिहास मान्य नाही व त्यांनी नवे संसद भवन उभारले. ते एखाद्या भव्य कोंडवाड्यासारखे वाटते. मोदी पंतप्रधान म्हणून ज्या ‘साऊथ ब्लाक’ इमारतीत कालपर्यंत बसत होते, ती इमारतसुद्धा त्यांना पारतंत्र्य व गुलामीचे प्रतीक वाटली आणि आता त्यांनी नवे पंतप्रधान कार्यालय ‘सेवातीर्थ’ नावाने उघडले. त्यामुळे राष्ट्राच्या जीवनात काहीच फरक पडत नाही. मोगल आणि इंग्रजांनी उभारलेल्या अनेक वास्तू मोदी पाडत आहेत व रस्ते, चौकांची नावे बदलत आहेत. भूकंपात मोठ्या इमारती कोसळून मातीचा ढिगारा व्हावा अशी अवस्था मोदींनी दिल्लीची करून ठेवली आहे, पण ज्या लाल किल्ल्याचे बांधकाम मोगल बादशहा शाहजहानने केले, त्या लाल किल्ल्यावरून मोदी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करतात व ‘वंदे मातरम्’ गानाचा सोहळाही करतात. लाल किल्ला हे त्यांना गुलामीचे प्रतीक वाटत नाही. शाहजहानने आपली राजधानी आग्रा येथून दिल्लीला हलवताना लाल किल्ला आणि शाहजहानाबाद शहर उभारले. या किल्ल्याचे मूळ नाव ‘किला-ए-मुबारक’ होते. त्या लाल किल्ल्यावरून मोदी मागची दहा-बारा वर्षे स्वातंत्र्य दिनाचा तिरंगा फडकवत आहेत व जनतेला कंटाळवाणी लांबलचक भाषणे देत आहेत. त्यामुळे लाल किल्ल्याऐवजी मोदींनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी दुसरा एखादा किल्ला उभारायला हवा, पण आता तेवढा वेळ त्यांच्यापाशी राहिलेला नाही. मोदी दिल्लीचे स्वरूप बदलायला निघाले आणि जनता मोदींनाच बदलायला निघाली असे चित्र आहे.
देशभक्तीचे ढोंग
मोदी-शहा व त्यांच्या लोकांचे ‘वंदे मातरम्’ प्रेम म्हणजे ढोंग आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच ज्यांनी आपल्या घरावर काळे झेंडे लावले व स्वातंत्र्यानंतर 52 वर्षे ज्यांनी तिरंगा फडकवला नाही असे लोक स्वातंत्र्य, ‘वंदे मातरम्’वर प्रवचने झोडत आहेत, तेसुद्धा लाल किल्ल्यावरून. मोदी-शहांच्या हातात असते तर त्यांनी ताजमहाल, लाल किल्ल्यावरही बुलडोझर चालवला असता. मोदींना इंग्रजांच्या वास्तू नकोत. ती गुलामी आहे, पण प्रे. ट्रम्प यांनी भारताला गुलाम बनवून ठेवले ते मान्य आहे. सोनिया गांधी इटलीच्या म्हणून मोदी त्यांच्यावर घाणेरडय़ा भाषेत टीका करतात, पण इटलीच्या पंतप्रधान श्रीमती जार्जिया मेलोनी यांच्यासाठी ‘मेलोडी’ चाकलेटचा डबा घेऊन जातात. मोदी भारतात मुसलमानांचा द्वेष करतात, पण मलेशिया, दुबई, सौदी-अरेबिया, इंडोनेशिया देशांच्या मुस्लिम शासकांना त्यांच्या देशात जाऊन मिठ्या मारतात. मोदी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मांतराविरोधात संसदेत कायदा आणतात, पण अशा धर्मांतराची सूत्रे जिथून हलतात त्या अमेरिकेच्या पायाशी उभे राहतात. मोदी गायीस गोमाता वगैरे बोलतात, पण गायीच्या कत्तली करून ‘बीफ’ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून भाजपसाठी देणग्या उकळतात. हे ढोंग आहे व तेच ढोंग ते ‘वंदे मातरम्’च्या बाबतीत करत आहेत. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 मध्ये रचलेल्या या मूळ गीतात एकूण सहा कडवी आहेत. हे गीत त्यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीत (1882) समाविष्ट आहे. या गीतातील पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रगीत म्हणून 1937 मध्ये काँग्रेसने आणि नंतर भारतीय राज्यघटनेने स्वीकारले. पहिल्या दोन कडव्यांत मातृभूमीचे नैसर्गिक सौंदर्य, समृद्धीचे वर्णन आहे; पण भाजपला हे कसे मान्य होईल? त्यांनी 2026 पासून सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये संपूर्ण सहा कडव्यांची सक्ती केली. तसा कायदाच आणला. सुमारे 3 मिनिटे 10 सेकंदांची ही सहा कडवी. इतके मोठे राष्ट्रगान जगात कोणत्याही देशाचे नसावे. स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारक फासावर गेले ते फक्त ‘वंदे मातरम्’ या दोन शब्दांचा घोष करीत. या दोन शब्दांत प्रचंड ऊर्जा आहे. ‘वंदे मातरम्’ची सहा कडवी गात ते फासावर गेले नाहीत. स्वतः मोदी, अमित शहा वगैरे लोक ‘टेलिप्रॉम्प्टर’शिवाय ‘वंदे मातरम्’ची सहा कडवी बिनचूक गाऊन दाखवतील काय? खरंच गाऊन दाखवतील काय? क्रांतिकारकांनी जसा ‘वंदे मातरम्’चा गजर करीत प्राणांची आहुती दिली, तसा आणखी एक नारा होता, तो म्हणजे ‘इन्कलाब जिंदाबाद!’ क्रांती अमर आहे हा त्याचा सरळ अर्थ. उर्दू कवी आणि स्वातंत्र्ययोद्धे मौलाना हसरत मोहनी यांनी 1921 साली हा नारा दिला व पुढे हुतात्मा भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तो स्वातंत्र्याचा नारा म्हणून लोकप्रिय केला. आता ‘इन्कलाब जिंदाबाद’चे जनक मौलाना हसरत मोहनी आहेत म्हणून मोदी त्यावरही बंदी घालतील व हा नारा देत भगतसिंग फासावर गेले हे गुलामीचे प्रतीक ठरवून इतिहासाच्या पुस्तकातून भगतसिंगांना वगळण्याचे आदेश देतील. सरकारला राष्ट्रभक्तीपेक्षा स्वतःचा नवा इतिहास लिहिण्यात आणि त्याच्या राजकीय उत्सव सोहळ्यात जास्त रस आहे.
प्रेरणा आणि चेतना
‘वंदे मातरम्’ ही एक प्रेरणा आणि चेतना होती व सदैव राहील. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय जनतेवर लादलेल्या गुलामगिरीविरोधात ‘वंदे मातरम्’ आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’ने वणवा पेटवला. आज देशात तीच शंभर वर्षांपूर्वीची स्थिती निर्माण झाली. ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’चे गान करणाऱ्या पोरांवर लाठ्या व पॅलेट गन्स चालवण्यात आल्या, तेही देशाच्या राजधानीत. ही बहुतेक मुले भगतसिंगांच्याच वयाची होती. मोदी सरकारने ‘वंदे मातरम्’ मान-अपमान विधेयक आणले हे बरेच झाले. याच ‘वंदे मातरम्’मधून नवी क्रांती पेटेल. त्यातून ‘इन्कलाब जिंदाबाद’चा मार्ग दिसेल. आजच्या ईस्ट इंडिया कंपनी (गुजरात) विरोधात आणि भाजपच्या सरकारमधील रॅण्ड, जॅक्सन, डायरविरोधात ‘वंदे मातरम्’च्या गर्जनेने क्रांती होईल, तेव्हा मोदी-शहा काय करणार?
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]




























































