
हिंदुस्थानच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असताना अलिबाग तालुक्यातील शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र गुडघाभर पाण्यात उभे राहून झेंडावंदन करावे लागले. शनिवारी आलेल्या पावसामुळे शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी गावात व शाळा परिसरात आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी पाण्यातूनच मार्ग काढावा लागला. अखेर गुडघाभर पाण्यात उभे राहून विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. गुडघाभर पाण्यात उभे राहून झालेल्या झेंडावंदनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.























































