
गडचिरोली जिह्यातील भामरागड तालुक्यात नक्षलींच्या दहशतीला तडा देत एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला आहे. येथील अत्यंत दुर्गम, घनदाट जंगल आणि कुमरी पहाडाच्या पुशीत वसलेल्या बिनागुंडा गावात स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतर पहिल्यांदाच राष्ट्रध्वज तिरंगा अभिमानाने फडकला.
गेल्या सात दशकांपासून हे गाव लाल सावलीच्या भीषण छायेत श्वास घेत होते. नक्षलवाद्यांची कमालीची दहशत, घनदाट जंगल आणि अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे येथे पोलीस यंत्रणा किंवा महसूल विभागाचे कर्मचारी पाऊल ठेवण्यासही धजावत नव्हते. रस्ते, वीज, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहिलेल्या स्थानिक माडिया गोंड जमातीतील नागरिकांना नक्षलवादी बंदुकांच्या सावलीत जीवन कंठावे लागत होते.
दरम्यान, गडचिरोली पोलीस दल आणि सीमा सशस्त्र बलाने दाखवलेल्या धैर्यामुळे हे चित्र बदलले आहे. 24 जानेवारी 2026 रोजी सुरक्षा दलांनी या आव्हानात्मक भागात जाऊन ‘विशेष पोलीस मदत केंद्र’ स्थापन केले. सुरक्षेची हमी मिळताच नक्षलवाद्यांची दहशत संपुष्टात आली आणि स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला.
रस्ते, सौर ऊर्जा अन् डिजिटल जग
आता सुरक्षा दलांच्या मदतीने ‘मुरूमकाठाई ते बिनागुंडा’ या पक्क्या रस्त्याचे आणि पुलांचे काम वेगाने सुरू आहे. गावात सौर ऊर्जेच्या साहाय्याने वीज पोहोचवण्यात आली असून मोबाईल टॉवर उभारल्यामुळे हे गाव पहिल्यांदाच जगाशी डिजिटल स्वरूपात जोडले गेले आहे. ग्रामस्थांसाठी बोअरवेल आणि सौर नळ योजना सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांच्या ‘दादलोरा खिडकी’ उपक्रमाद्वारे गावात वैद्यकीय शिबिरे भरवून मोफत औषधोपचार पुरवले जात आहेत.























































