
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री मार्लेश्वर देवस्थान ट्रस्ट, मारळ यांनी मंदिराचे पवित्र्य आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी मंदिर प्रवेशाबाबत एक महत्त्वपूर्ण नियमावली जारी केली आहे. तोकडय़ा, असभ्य कपडय़ांमध्ये मंदिरात प्रवेशबंदी करण्याचा मोठा निर्णय देवस्थानने घेतला आहे.
बंदी घालण्यात आलेले कपडे-अंगप्रदर्शक, असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्र (उदा. शॉर्ट्स, फाटलेल्या जिन्स, छोटे ड्रेसेस) आणि असात्विक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. भाविकांनी भारतीय संस्कृतीचे पालन करून पूर्ण आणि अंगभर वेशभूषेतच दर्शन घ्यावे. सर्व भाविक व पर्यटकांनी या नियमांचे तंतोतंत पालन करून मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. श्री मार्लेश्वर देवस्थानचे पावित्र्य राखण्यासाठी भाविकांनी संस्कृतीला साजेसा पेहराव करूनच दर्शनासाठी यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.























































