
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात झाली. मालकेतील पहिला कसोटी सामना गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. या पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत सामन्यावर मजबूत पकड निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. यशस्वी झटपट बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या देवदत्त पडिक्कलने संयमी फलंदाजी करत आपलं कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं. त्याने 9 चौकार आणि 1 षटकार ठोकत शतक ठोकलं.
या शतकासह देवदत्त पडिक्कलने एक मोठा इतिहास रचला आहे. तो 21 व्या शतकात टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी शतक झळकावणारा दुसराच डावखुरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सौरव गांगुलीने 2002 मध्ये दिल्ली येथे झिम्बाब्वेविरुद्ध 136 धावांची खेळी केली होती. याशिवाय, टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर कसोटी शतक ठोकणारा तो दुसरा हिंदुस्थानी फलंदाज ठरला असून, यापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये शुभमन गिलने चेन्नईत बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती.
गॉल कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना काही वेळ थांबवण्यात आला होता. मात्र, पुन्हा सामना सुरू झाला. 67 षटकांचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 2 गड्यांच्या मोबदल्यात 255 धावांपर्यंत मजल मारली होती. देवदत्त पडिक्कलने 157 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 1 षटकार मारत 117 धावांवर फलंदाजी करत आहे. तर केएल राहुलने 162 चेंडूंचा सामना करत 77 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर आलेला कर्णधार शुभमन गिल स्वस्तात माघारी परतला (16). सध्या पडीक्कल सोबत ऋषभ पंत (8) फलंदाजी करत आहे.






























































