काहीतरी शिजतंय..! डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला किम जोंग उनसोबतचा जुना फोटो; म्हणाले, “आमच्या चेहऱ्यावर जरी…”

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी एक खळबळजनक विधान केले होते. जगातील तेल व्यापारासाठी महत्त्वाचा सागरी मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच अमेरिकेचा प्रांत घोषित होईल, असे ट्रम्प म्हणाले होते. यामुळे जगभरात खळबळ उडालेली असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पडद्यामागे नक्की काय शिजतंय याची चर्चा जागतिक स्तरावर सुरू आहे.

अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये विस्तवही जात नाही हे जगजाहीर आहे. उत्तर कोरियाने अनेकदा अमेरिकेला खुलेआम धमकीही दिलेली आहे. राजकीय वाद, अण्वस्त्रांच्या धमक्या या पार्श्वभूमवीर डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्यासोबतचा फोटो शेअर केल्याने चर्चेची गुऱ्हाळे सुरू झाली. या फोटोसोबत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक कॅप्शनही दिलेले आहे. या खास फोटोमध्ये आमच्या चेहऱ्यावर तणाव किंवा कठोर भाव दिसत असले तरी आमचे हसतानाचेही अनेक फोटो आहेत. किम जोंग उन आणि माझे संबंध अत्यंत उत्तम आहेत, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, याआधी 14 जून 2026 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्यासोबत चालतानाचा असाच एक फोटो कोणत्याही कॅप्शनशिवाय शेअर केला होता. हा फोटो 2018 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या ऐतिहासिक शिखर परिषदेदरम्यानचा आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळात उभय नेत्यांमध्ये तीन वेळा भेट झाली होती. एका विद्यमान अमेरिकन अध्यक्षांची उत्तर कोरियाच्या प्रमुखासोबत झालेली ही पहिलीच ऐतिहासिक भेट ठरली होती. मात्र 2019 मधील हनोई शिखर परिषदेत अण्वस्त्रमुक्ती आणि आर्थिक निर्बंध उठवण्याच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्यामुळे ही मुत्सद्दी चर्चा निष्फळ ठरली होती.

चर्चेचे संकेत की…

डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्याशी पुन्हा थेट चर्चा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांनी किम यांची पुन्हा भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. दुसरीकडे, जून 2026 मध्ये दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांनी उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमाबाबत टप्प्याटप्प्याने मार्ग काढण्याचा प्रस्ताव मांडला होता.

काय होता प्रस्ताव?

  • उत्तर कोरियाने नवीन अण्वस्त्र साहित्याची निर्मिती तात्काळ थांबवणे
  • अण्वस्त्र तंत्रज्ञान किंवा सामग्री दुसऱ्या देशात हस्तांतरित न करणे
  • ‘इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा पुढील विकास रोखणे
  • पूर्ण अण्वस्त्रमुक्ती हे अंतिम ध्येय ठेवणे

उत्तर कोरियाचा आक्रमक पवित्रा कायम

ट्रम्प यांच्या या सकारात्मक विधानांनंतरही उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्र कार्यक्रम सोडण्यास नकार दिला आहे. जुलैमध्ये पार पडलेल्या नाटो परिषदेनंतर उत्तर कोरियाने अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांवर लष्करी तणाव वाढवल्याचा आरोप केला होता. आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा केवळ स्वतःच्या लष्करी क्षमतेच्या जोरावरच सुरक्षित ठेवली जाईल, असा इशारा प्योंगयांगने दिला आहे.