
देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जुनेच चॉकलेट नव्या वेष्टनात दिले. ‘नशामुक्त भारत’, ‘विकसित भारत’ या आधीच्याच घोषणांची व महिला आरक्षणाच्या झालेल्या निर्णयाची उजळणी करतानाच मोदींनी पुन्हा एकदा नक्षलविरोधी राग आळवला. ‘देश सशस्त्र नक्षलवाद्यांपासून मुक्त झाला आहे, मात्र ‘दिमागी नक्षल’वादाचा धोका अजूनही कायम आहे. त्यापासून सावध राहा,’ असे आवाहन त्यांनी केले. मोदींच्या या ‘राजकीय’ भाषणाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. मोदींनी युवक, शिक्षित आणि कॉक्रोचेसची संभावना ‘दिमागी नक्षल’ म्हणून केल्याचा आरोप विरोधकांनी केला तर सोशल मीडियातही या भाषणावर टीकेची झोड उठली.
जंतरमंतरवर झालेले विद्यार्थी आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना द्यावा लागलेला राजीनामा, विद्यार्थ्यांवरील हल्ल्यावरून विरोधकांनी संसदेत केलेल्या सरकारच्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात बोलले. केंद्र सरकारच्या कामाचा पाढा वाचताना मोदींनी नक्षलवादाच्या उच्चाटनाचा मुद्दा मांडला. ‘‘आमच्या सरकारने जंगलातील नक्षलवादाचा बीमोड केला आहे. मात्र वैचारिक नक्षलवाद अजूनही कायम आहे. हे दिमागी नक्षलवादी समाजाला चुकीच्या वाटेवर नेण्यासाठी व अराजक माजवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना ओळखून एकटे पाडायला हवे,’’ असे मोदी म्हणाले. देशाची सुरक्षा फक्त सशस्त्र हिंसाचाराला रोखण्यापुरती मर्यादित नाही. तरुणांना नशामुक्त आणि हिंसाचारापासून दूर ठेवून मुख्य प्रवाहाशी जोडणेही तितकेच गरजेचे आहे. नशामुक्त भारतासाठी देशातील सर्व वर्गांनी सोबत यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
राहुल गांधी यांची अनुपस्थिती
विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला अनुपस्थित राहिले. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सप्तधाराचा उल्लेख
हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी मोदींनी सात शक्तींच्या सप्तधारेचा उल्लेख केला. त्यात उत्पादन, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान व संशोधन, गती, संरक्षण, ग्रीन व ब्लू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पावर यांचा समावेश आहे. या सप्तधारेच्या जोरावर गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही, ते सात वर्षांत करायचे आहे, असे मोदी म्हणाले. देशात तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांमध्ये काम सुरू झाले असून त्यातील उत्पादनांची निर्यात सुरू झाली आहे, असा दावाही मोदींनी केला.
आंदोलनावर बोलणे टाळले!
मोदींनी डिजिटल इंडिया, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, एआय, फ्री ऑनलाईन कोचिंग अशा नव्या पिढीला आपल्याशा वाटणाऱया विषयावर भाष्य केले. मात्र तरुणांना त्रस्त करणाऱया, अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या केंद्रीय परीक्षांमधील घोटाळ्यांवर बोलणे त्यांनी टाळले.
























































