
>> शुभांगी बागडे ([email protected])
श्रावणमासातील पहिला सण नागपंचमी. यानिमित्त जाणून घेऊया अलिबागच्या आवासमधील नागेश्वर मंदिराबाबत. ऐश्वर्यसंपन्न, भक्तांच्या गर्दीने गजबजलेली मंदिरांना आपण नेहमीच भेट देतो, परंतु काही मंदिरं अशा झगमगाटापासून दूर राहत आपल्या गावकुसाची ओळख दर्शवत राहतात. निसर्गाने भरभरून दान दिलेल्या अलिबाग जवळील आवासमध्ये वसलेले नागेश्वर मंदिर याची साक्ष देते. अलिबागपासून 13 किलोमीटर अंतरावर वसलेले आवास हे वनश्रीने नटलेले गाव. गर्द वनश्रीने नटलेले आवास प्रसिद्ध आहे ते इथल्या नागेश्वर मंदिरासाठी. कोकणातील मंदिरांसारखंच कौलारू छताचं, लाकडाचा वापर करून बांधलेले हे देखणं मंदिर. बहुतांश लाकडी फ्रेमवर्कमध्ये साकारलेली मंदिराची बांधणी आहे. मंदिराच्या आवारात कोकण मंदिरशैलातील दीपमाळ आहे. सभागृहात नवसासाठी बांधलेल्या अनेक घंटा दिसतात.
सध्याचे मंदिर 1926 च्या सुमारास लोकवर्गणीच्या माध्यमातून बांधण्यात आले असून त्यापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम मापगांव येथील गणू उर्फ बाळाजी सखोजी राऊत यांनी 1856 च्या सुमारास केला होता.
कोणत्याही मंदिरात दिसतात तशा देवदेवतांच्या मूर्तीऐवजी इथे सर्प प्रतिमा आढळतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला, तिथल्या ग्रामदेवता, कुलदेवतांच्या मंदिरांना अशा स्वतंत्र कथा असते. या कथा आपल्या लोकसंस्कृतीला पुढे नेतात. कोणे एकेकाळी इथं नागोबा नावाचे सत्पुरुष राहत होते आणि त्यांच्या सोबत त्यांचे शिष्य बुधोबा आणि चांगोबा देखील वस्तीला होते अशी आख्यायिका आवास भागात प्रसिद्ध आहे. नागोबांची शंभरी पूर्ण झाल्यावर त्यांनी व त्यांच्या शिष्यांनी संजीवन समाधी घेतली. शेषनारायण या दैवतावर त्यांची श्रद्धा असल्याने समाधीवस्थेनंतर ते सर्परूपात प्रकट झाले असे मानले जाते. त्यांची पाषाणरूपात पूजा केली जाते. याच ओघाने या देवस्थानाबाबत भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथे सर्पदंशाचे विष उतरवले जाते.
श्रावणी सोमवार व नागपंचमी इथे पारंपरिक रितीने उत्साहात पार पाडले जातात. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला समाधिस्त सोहळ्यानिमित्त नागोबा देवस्थानाची वार्षिक यात्रा पार पडते. बैलगाडी घेऊन दर्शनाला जाण्याची परंपरा आजही इथे पंचक्रोशीत पाळली जाते. या उत्सवात नागेश्वर मंदिरात गण खेळण्याची परंपरा आजही सुरू आहे. नागेश्वराला पेरकूट, नारळ, सुपारी केवडा अर्पण करीत एक गण मंदिरात नवसाच्या लावलेल्या शेकडो घंटा वेताच्या छडीने वाजवतो. गणाचा हा खेळ तीन दिवस रात्री खेळला जातो.
आवासमधील समुद्राच्या लयीचा श्रांत अनुभव घेत या परिसरातील वक्रतुंड विनायक मंदिर आणि, कोळी समाजात महत्त्वाचे स्थान असलेले पांडवा देवीचे मंदिर आणि जवळच सासवणे येथील करमरकर शिल्पकला संग्रहालय पाहण्यासारखे आहे.


























































