
>> माधव गवाणकर
स्वाभाविकपणे फक्त स्त्री-पुरुष संबंध, प्रेम या विषयांत रमणाऱ्या मध्यमवर्गीय साहित्यविश्वाला धक्के देणारे साहित्य अधूनमधून प्रकाशित होते. लिंगपरिवर्तन व त्यातून निर्माण होणारे गुंते या अजब वेगळ्या विषयावर डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी लिहिलेली ‘मीपण माझे’ ही कादंबरी एकेकाळी लक्षवेधी ठरली होती. लेखक किशोर तरवडे यांनी लिहिलेली ‘नागकिन्नरी’ ही कादंबरी त्याच पठडीतील असली तरी वास्तव आणि काल्पनिक अद्भुतता यांचे रंजक मिश्रण करून तरवडेंनी ती साकार केली आहे. अर्थात मुळातच भेदक असलेल्या सामाजिक वास्तवाला, तृतीयपंथी लोकांच्या बहिष्कृत जीवनाला अद्भुतरम्यतेचे गूढ वलय, फिक्शनसारखे रूप द्यावे का? विषयाची हाताळणी कशी करावी, हे त्या कादंबरीकाराचे स्वातंत्र्य आहे.
पाताळ लोकातील इच्छाधारी नागीण आणि तिच्यापासून विलग झालेला तिचा जिवलग यांचे भावबंध, वियोग आणि संघर्ष यांची ही सरस कहाणी आहे. लैंगिकता या विषयाचे अभ्यासक जमीर कांबळे यांची पुस्तकाला लाभलेली प्रस्तावनाही वाचनीय आहे. या कादंबरीत एक अंधश्रद्धात्मक पदरही आहे. त्यामुळे कथानक काही ठिकाणी मनोरंजक हिंदी चित्रपटाप्रमाणे वाटू लागते. तसेच वंचित ट्रान्सजेंडर समुदायाची घुसमट, समाजाकडून सतत मिळणारा तिरस्कार, त्यांची जीवनशैली, त्यातील तणाव आणि आपापसातील एकोपा किंवा अंतर्गत कलह असाही भाग त्यात येणे अपेक्षित होते व तसा तो बऱ्याच अंशी आला आहे.
मात्र, असे राहून राहून वाटते की, केवळ वास्तव, सामाजिक पातळीवर हे कथानक वावरले असते तर अधिक प्रभावी होऊन त्या समुदायाच्या मानसिक जखमा जास्त ठळक झाल्या असत्या.
शापित आयुष्य मुक्ती, नागसेन व नागनंदा, पाताळ व पृथ्वी पूर्वजन्म अशा अंगाने कादंबरी गेल्यामुळे मूळ विषयाला बगल मिळाल्यासारखे वाटत राहते. भूत आणि वर्तमानाचा संयोग करता करता प्रेमभावनेचा उत्कट आविष्कार आणि नियतीच्या प्रभावामुळे निर्माण झालेला दुखरेपणा लेखकाना दर्शवला आहे. लिंगपरिवर्तनाची एकूण प्रक्रिया मुळात परिपूर्ण नाही. त्यामुळे ‘कोती’ (स्त्रैण मुलगा, जो स्वतःला स्त्री समजतो) कधीही पूर्ण स्त्री बनू शकत नाही. ट्रान्सवुमन म्हणूनच त्याच्याकडे ‘परिवर्तन’ करून घेतल्यानंतरही पाहिले जाते. ही अपूर्णता या कथानकातही जाणवते व किन्नरांचे एका अर्थी उद्ध्वस्त जीवन सामान्य वाचकांना भयचकित करते. पारलिंगी व्यक्तीच्या जीवनातील कारुण्यही काही वाचकांना जाणवेल. ‘विकृत’ या एका शब्दात असे विषय आतापर्यंत ठोकरले गेले, पण ललित साहित्यातही आता अशा विषयांचे चित्रण अधिक खुलेपणाने होत आहे. ‘नागकिन्नरी’मध्ये हा मोकळेपणा असला तरी ही कादंबरी मोकाट सुटलेली नाही.
कथानकाचे तपशील, गुंतागुंत वाचकांनी मुळातूनच वाचावी. काही ठिकाणी जुन्या वळणाची लांबलचक वाक्ये लेखक लिहीत जातात. तिथे त्यांचा नवखेपणा जाणवतो. आजचा प्रवाह (ट्रेंड) सुटसुटीत वाक्यरचनांचा आहे. संवादांचा वापरही कथानकाच्या ओघात केलेला आहे व एकूण रचना नाट्यमय आहे. खरे तर या कादंबरीवर आगळीवेगळी दृक् -श्राव्य मालिकाही होऊ शकेल. आपल्या राहून गेलेल्या अधुऱ्या मीलनासाठी मार्गस्थ झालेले नागरूपी प्रियकर व चमकदार हिरव्या कांतीची सळसळती प्रिया अर्थात नागीण व प्रणय संकेत लेखकाइतकेच वाचकांनाही सुखावतील.
भाषाशैलीची सुंदरता तरवडेंनी माफक रूपात वापरली आहे. उदा. ‘नव्याने आलेल्या रूपात ती इतकी मनोहारी दिसत होती की, जणू हिरव्या पाचूंची चकाकती माळ गवतातून चालली आहे. तिच्या पाठीवरील लांबट उभे सोनेरी रंगाचे ठिपके जणू तिने सर्वांगावर सौभाग्याचे दागिने ल्यायलेत असा आभास आणत होते.’ मुळात हिरवा रंग हा सौभाग्य सूचक आहे. हे सौभाग्य, पूर्ण स्त्रीत्व किन्नरांना कधीच लाभत नाही. खरे तर तोच त्यांचा आणि एकूणच LGBTQ समुदायाचा आक्रोश आहे. मात्र, स्वप्नील पातळीवर तरवडेंनी ही परिपूर्णता त्यांना देण्याचा प्राणीरूपात पात्रे आणून प्रयत्न केला असावा. प्रतीक व प्रतिमांच्या रूपातही या साहित्यकृतीचे काही अर्थ लावता येतात.
कादंबरीचा काही भाग किन्नरांच्या जीवनातील कुरूपताही समोर ठेवतो, पण त्यातही वैफल्य, व्यसने, शरीर विक्रय यामागची त्यांची अपरिहार्यता दिसून होते. स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करताना ‘ट्रान्स’ लोकांचे जीवन, किन्नरांची उपेक्षा, स्वप्नभंग हे सगळं लेखकाने जवळून पाहिले होते. समाजाला सर्वसाधारपणे न रूचणारे असे हे विषय, या कथाबीजांना कादंबरीच्या कल्पनारम्य सृष्टीत घोळवून मांडणारा हा प्रयोग वाचनीय आहे.
नागकिन्नरी (कादंबरी)
लेखक : किशोर तरवडे
प्रकाशक : मैत्री पब्लिकेशन, पुणे
पृष्ठे : 224
मूल्य : 350 रुपये


























































