
>> राजेश पोवळे
ज्येष्ठ उद्योगपती आणि ‘विको’ लॅबोरेटरीजचे संचालक सुमंत पेंढरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या निधनाने स्वदेशी विचारांवर विश्वास ठेवणारे, मूल्याधिष्ठीत उद्योजगतेचा आग्रह धरणारे एक ज्येष्ठ उद्योगरत्न हरपले आहे.
‘विको’ म्हटले की भारतीय आयुर्वेद, स्वदेशी उत्पादनांवरील विश्वास आणि घराघरांत पोहोचलेला एक आपला ब्रॅण्ड डोळ्यांसमोर उभा राहतो. या ब्रॅण्डला केवळ व्यावसायिक यश मिळवू न देता भारतीय आयुर्वेदिक उत्पादनांना देशाच्या सीमा ओलांडून जागतिक बाजारपेठेत प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ उद्योगपती आणि विको लॅबोरेटरीजचे संचालक सुमंत पेंढरकर यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने उद्योग विश्वाबरोबरच समाजकारण आणि आयुर्वेद क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आजच्या जाहिरातींच्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेच्या युगात भारतीय उत्पादनाला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून देणे सोपे नव्हते. मात्र ‘विको’ने हे करून दाखवले. आयुर्वेदिक टूथपेस्टपासून, त्वचा निगा उत्पादने आणि विविध हर्बल उत्पादनांपर्यंत ‘विको’ने भारतीय घराघरांत आपले स्थान निर्माण केले. या प्रवासात पेंढरकर कुटुंबाच्या अनेक पिढय़ांचे योगदान राहिले. त्यातील सुमंत पेंढरकर हे दीर्घकाळ या उद्योगाच्या वाटचालीशी जोडलेले एक महत्त्वाचे नेतृत्त्व होते.
सुमंत पेंढरकर यांचे वडील केशव पेंढरकर यांनी ‘विको’ कंपनीची स्थापना केली. सुमंत पेंढरकर यांचा जन्म 1943 चा. वयाच्या 20-22 व्या वर्षापासूनच त्यांनी ‘विको’त काम करण्यास सुरुवात केली. 1963-64 चा तो काळ. वडिलांची कंपनी आहे आणि आपण मालक आहोत ही भावना मनात न ठेवता त्यांनी ‘विको’त आधी सेल्स, मग मार्केटिंग, फॅक्टरी प्रोडक्शन, परचेसिंग अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. गजानन, यशवंत, सुमंत, जयंत आणि अशोक या पाच भावंडांनी वडिलांच्या पश्चात ‘विको’चा वेलू गगनावरी नेला. सुमंत पेंढरकर हे ‘विको’ प्रोडक्ट्स नागपूर एलएलपीसह विविध संबंधित संस्थांमध्ये नेहमीच नेतृत्वाच्या भूमिकेत राहिले. चार दशकांहून अधिक काळ एखाद्या उद्योगाशी असलेले हे नाते केवळ व्यावसायिक संबंध नव्हते तर तो एका विचाराचा, परंपरेचा आणि एका स्वदेशी ध्येयाचा प्रवास होता.
भारतात आयुर्वेदाची परंपरा हजारो वर्षांची असली तरी आधुनिक ग्राहकांच्या गरजांशी त्याची सांगड घालणे, उत्पादनांना आधुनिक स्वरूप देणे आणि त्यांना बाजारपेठेत विश्वासार्ह स्थान मिळवून देणे हे एक मोठे आव्हान होते. ‘विको’ने हे आव्हान स्वीकारले. आयुर्वेदिक तत्त्वांवर आधारित उत्पादनांना आधुनिक पॅकेजिंग, व्यापक वितरण आणि प्रभावी विपणनाचे जोड देत ‘विको’ने बाजारपेठेत आला ठसा उमटवला. सुमंत पेंढरकर यांच्या नेतृत्त्वाच्या काळात या प्रवासाला अधिक व्यापक स्वरूप मिळाले. ‘भारतीय मातीतील ज्ञान जगाच्या बाजारपेठेत पोहोचवता येते, भारतीय उत्पादनही जागतिक दर्जाचे ठरू शकते आणि स्वदेशी असणे म्हणजे मागे असणे नव्हते तर स्वतःची स्वतंत्र ओळख असणे होय’ हा संदेश ‘विको’च्या वाटचालीतून अधोरेखित झाला. सुमंत पेंढरकर यांच्या पिढीने स्वदेशी उद्योगाचा अर्थ प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. उद्योगविश्वात काही व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात राहतात. काहींची ओळख त्यांच्या जाहिराती, मुलाखती किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमुळे होते. मात्र काही व्यक्ती संस्था उभारण्याच्या आणि टिकवण्याच्या प्रक्रियेत पडद्यामागे राहून सातत्याने काम करतात. सुमंत पेंढरकर हे अशाच प्रकारचे व्यक्तिमत्त्व होते. ‘विको’च्या उत्पादनांवर ग्राहकांचा विश्वास निर्माण होत गेला. त्याचबरोबर संस्थेची पुढील पिढीकडेही वाटचाल सुरू झाली. सुमंत पेंढरकर यांचे पुत्र देवेश पेंढरकर यांनीही ही जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. पत्नी मृणालिनी यांच्यासह पुत्र देवेश, मुलगी माधवी आणि सून लीना यांच्यासह आप्तस्वकीय असा सुमंत पेंढरकर यांचा परिवार आहे.
‘विको’चा इतिहास हा एका मराठी कुटुंबाने उभ्या केलेल्या उद्योगाचा इतिहास आहे. एकीचे बळ हाच या कुटुंबाचा मंत्र आहे. पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती लोप पावली आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा अंगीकार सर्वत्र सुरू झाला, पण इतक्या दशकांच्या वाटचालीत पेंढरकर कुटुंबातील पाचही भावंडे आणि त्यांची मुले, नातवंडे आजही एकत्र कुटुंब पद्धतीत राहतात.
सुमंत पेंढरकर 82 वर्षांचे कृतार्थ आयुष्य जगले. उद्योगातील चढ-उतार, बाजारपेठेतील बदल, नव्या पिढीचे आगमन आणि बदलत्या भारताचे चित्रही त्यांनी जवळून पाहिले. त्यांच्या निधनाने पेंढरकर कुटुंबाने ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे. स्वदेशी विचारांवर विश्वास ठेवणारे, मूल्याधिष्ठीत उद्योजगतेचा आग्रह धरणारे एक ज्येष्ठ उद्योगरत्न हरपले आहे, परंतु पेंढरकर बंधूंनी उभारलेल्या संस्थेच्या उत्पादनातून त्यांनी जपलेल्या स्वदेशी विचारातून आणि पुढच्या पिढीकडे सोपवलेल्या उद्योगवारशातून त्यांचे कार्य पुढे सुरूच राहणार आहे.



























































