आरबीआयची ‘फॉरेक्स स्वॅप सुविधा’ बंद, अनिवासी हिंदुस्थानींनी डॉलरचा पाऊस पाडताच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परकीय चलनाची प्रचंड आवक आणि अनिवासी भारतीय ठेवीदारांकडून मिळालेला उदंड प्रतिसाद लक्षात घेता, रिझर्व्ह बँकेने विशेष एफसीएनआर (बी) ठेवींसाठीची सवलत दिलेली ‘फॉरेक्स स्वॅप सुविधा’ महिनाभर आधीच बंद करण्याचा निर्णय घेतला. आता बँकांसाठी अशा ठेवी जमा करण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबरऐवजी 31 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, या सुविधेद्वारे 13 ऑगस्टपर्यंत 5,684 कोटी डॉलर इतका प्रचंड निधी हिंदुस्थानी बँकांमध्ये आला आहे. वाढता प्रतिसाद पाहता, सुधारित वेळापत्रक जाहीर केले गेले. त्यानुसार, बँकांना आता या योजनेअंतर्गत केवळ 31 ऑगस्ट 2026 पर्यंतच ठेवी आकर्षित करता येतील. तर या ठेवींच्या बदल्यात मध्यवर्ती बँकेशी 11 सप्टेंबर 2026 पर्यंत स्वॅप व्यवहार पूर्ण करता येतील. मूळ वेळापत्रकानुसार ठेवी जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर आणि स्वॅप व्यवहारांसाठी 16 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली होती.

रिझर्व्ह बँकेने ‘एफसीएनआर(बी)’ ठेवींसाठीची विशेष योजना मुदतीआधीच बंद केली असली, तरी परदेशी चलनातील कर्जरोखे (ओएफसीबी) आणि बाह्य व्यावसायिक कर्जे (ईसीबी) यासाठी जाहीर केलेल्या स्वॅप योजना मात्र पूर्वघोषित वेळापत्रकानुसार 31 डिसेंबर 2026 पर्यंत सुरूच राहतील.

एफसीएनआर (बी) ठेवी म्हणजे काय?

अनिवासी भारतीय, ओव्हरसीज सिटीझन्स ऑफ इंडिया आणि पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांना भारतात परकीय चलनात मुदत ठेवी ठेवण्याची सुविधा म्हणजे एफसीएनआर (बी) खाते होय. या खात्यात पैसे भारतीय रुपयात रूपांतरित न करता यूएस डॉलर, पाऊंड, युरो, येन, ऑस्ट्रेलियन डॉलर आणि पॅनेडियन डॉलर अशा प्रमुख चलनांमध्ये ठेवता येतात. या ठेवींवर ठेवीदारांना विशेष सवलत मिळते.