
धारावी झोपडपट्टीवासीयांना 500 चौरस फुटांची घरे-दुकाने मिळालीच पाहिजे तसेच सर्व पात्र-अपात्र झोपडपट्टीवासीयांचे धारावीतच पुनर्वसन झाले पाहिजे या मागणीचा पुनरुच्चार करण्यासाठी शनिवारी सायंकाळी धारावीकरांनी तिरंगा रॅली काढली. या रॅलीत हजारो धारावीकर सहभागी झाले होते.
धारावी बचाव आंदोलन या संघटनेच्या वतीने ही रॅली काढण्यात आली. संविधान चौक येथून निघालेल्या रॅलीचा समारोप शिवनारायण बावडीजवळ झाला. तिरंगा रॅलीचे नेतृत्व धारावी बचाव आंदोलन नेते समन्वक माजी आमदार बाबुराव माने, राजू कोरडे, नसीरूल हक, राष्ट्रवादीचे उल्लेश गाजाकोश, आपचे पॉल राफेल, आरपीआयचे अनिल कसारे आदींनी केले. श्यामलाल जैसवार, राहुल गायकवाड, समीर मगरू, अंसार शेख, आयुब शेख, कलम भाई, शेकाप पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या साम्या कोरडे, माया जाधव, सुरेश सावंत आदींसह हजारो धारावीकर या रॅलीत तिरंगे घेऊन सहभागी झाले होते.
धारावीत सरकारने झोपडय़ांना पात्र-अपात्र करण्याचा सुरू केलेला खेळ बंद करावा आणि सरसकट सर्वच धारावीकरांना 500 चौ.फु.ची घरे धारावीतच द्यावी आणि हे लेखी आश्वासन राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी माजी आमदार बाबुराव माने यांनी केली.























































