‘दिमागी नक्षल’ वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींवर CJPचे टीकास्त्र; ‘सरकारला प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना नक्षलवादी ठरवू नका’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘दिमागी नक्षल’ या वक्तव्यावरून कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. सरकारला प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना नक्षलवादी ठरवणे योग्य नसल्याचे दास यांनी म्हटले आहे.

लाल किल्ल्यावरून देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी सशस्त्र नक्षलवादाचा अंत जवळ आल्याचे म्हटले. मात्र, ‘दिमागी नक्षल’ मानसिकता असलेल्या काही लोकांकडून हिंसा आणि अशांतता निर्माण करण्यासाठी संधी शोधली जात असल्याचा इशाराही त्यांनी दिला. अशा लोकांना ओळखून त्यांना समाजापासून दूर ठेवण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले. त्याचबरोबर तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सौरव दास यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “दिमागी नक्षल किंवा काहीही म्हणा, हे चालणार नाही पंतप्रधान. केवळ तुमच्या सरकारला प्रश्न विचारतात म्हणून सुशिक्षित तरुणांना सरसकट ‘नक्षलवादी’ कसे म्हणू शकता? हा निव्वळ अहंकार आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यात असलेली अक्षमता स्पष्ट दिसत आहे.”

“धोक्याच्या घंटा वाजत आहेत. जागृतीची सुरुवात झाली आहे,” असेही दास यांनी म्हटले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या आणखी एका संदेशात दास यांनी गेल्या 12 वर्षांनंतर देश कदाचित खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन साजरा करत असल्याचे म्हटले. “आपल्यातील काहीतरी अखेर मुक्त झाले आहे आणि ते म्हणजे भीती,” असे त्यांनी नमूद केले.

गप्प राहण्यास सांगितलेल्या एका पिढीला आता आपला आवाज सापडला आहे, तर काहीही बदलणार नाही असे सांगितलेल्या लोकांना पुन्हा बदलाची आशा वाटू लागली आहे, असा दावा दास यांनी केला. “जागृतीचे युग सुरू झाले आहे. शांततापूर्ण आंदोलनाचे युग सुरू झाले आहे,” असे ते म्हणाले.

भविष्यात लोक जुन्या, भ्रष्ट, अकार्यक्षम आणि अहंकारी व्यवस्थेला दूर करतील, असेही दास यांनी म्हटले. देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक ‘जंतरमंतर’ निर्माण होत असल्याचे सांगताना त्यांनी त्याची तुलना अशा ठिकाणाशी केली, जिथे निराश झालेल्या लोकांना एकमेकांमध्ये आशा मिळेल आणि स्वतःला शक्तिहीन समजणाऱ्या लोकांना एकत्र उभे राहण्याची ताकद मिळेल.

सत्ताधारी Gen-Z आणि तरुणांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही दास यांनी केला. “तुमची Gen-Z विरुद्ध आमची Gen-Z” अशा पद्धतीने तरुणांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.

“कारण त्यांना इतिहास काय सांगतो हे माहीत आहे. फूट पाडण्यास नकार देणाऱ्या जनतेपेक्षा शक्तिशाली काहीही नसते. ते फूट पाडतील, आम्ही एकत्र येऊ. ते भीती पसरवतील, आम्ही धैर्य पसरवू. आता मन भीतीमुक्त झाले आहे आणि आता मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नाही,” असे दास यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.