
>> अक्षय मोटेगावकर
राजकारण, समाजकारण ते साहित्य-संस्कृती अशा बहुविध विषयांना वाहिलेल्या थिंक बँक या यू टय़ूब चॅनेलवरील विश्लेषणात्मक चर्चा आपल्या ज्ञानात भर टाकणाऱ्या आहेत.
यूटय़ूब पाहणाऱया मराठी माणसाला थिंक बँक हे नाव माहीत असतेच. फक्त व्हायरल नव्हे तर व्हायटल कन्टेन्ट देणारे हे चॅनेल मराठी श्रोत्यांमध्ये खास प्रसिद्ध आहे. कला, इतिहास, उद्योजकता, संरक्षणशास्त्र, अर्थकारण, राजकारण, मानसशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य व संस्कृती यांसारख्या कित्येक क्षेत्रांतील तज्ञ मंडळींबरोबर या चॅनलच्या थिंक बँक पॉडकास्टसमध्ये ऊहापोह होतो. सामाजिक अभिसरणाचा अविभाज्य भाग असलेले बदलते सामाजिक प्रवाह, पद्धती यावरसुद्धा या पॉडकास्टसमध्ये नियमितपणे चर्चा होते. विषयांचे अफाट वैविध्य हे या पॉडकास्टचे वैशिष्टय़. शक्यतो कोणताही अनाठायी विवाद होणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात.
वेगवेगळ्या विचारधारांचे, पक्षांच्या, व्यक्तींच्या, विचारांच्या वैचारिक मुशीतून तयार झालेली मंडळी या पॉडकास्टमध्ये असतात. त्यामुळे प्रेक्षकांना त्याविषयाशी संबंधित मुद्देसूद माहिती मिळते. कुठेही मुलाखत भडक करण्याचा आणि त्यायोगे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न नसतो, विषय समजावून सांगण्यावर भर दिला जातो आणि मुख्य म्हणजे चर्चा ही संवादासारखी वाटते. वादविवादसारखी नाही.
मी पाहिलेला थिंक बँकचा पहिला पॉडकास्ट म्हणजे सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी यांचा. ही थिंक बँक टीमने घेतलेली पहिली सामाजिक आणि राजकीय आशय सोडून वेगळ्या विषयातील ही मुलाखत. विनायक पाचलग यांनी ही मुलाखत घेतलेली आहे. बहुधा अडीच-तीन वर्षांपूर्वीची असावी. वैभव जोशी त्यांच्या कवितेच्या क्षेत्रातील दिलखुलास मुशाफिरीबद्दल बोलले आहेत. त्यांचा इंजिनीअरकडून पूर्णवेळ कवी, गीतकार हा प्रवास कसा झाला हे उलगडून दाखवतात. एवढंच काय तर सुरुवातीच्या काळात कोणी कोणी प्रोत्साहन दिले, या क्षेत्रातील वेगवेगळ्या वाटा दाखवल्या हेही तेवढय़ाच कृतज्ञपणे नमूद करतात. विनायक पाचलग हेदेखील शिक्षणाने इंजिनीअर. तेव्हा दोन वेगळी वाट चोखाळणारे इंजिनीअर्स जेव्हा एकत्र बसतात आणि एखादा विषय चर्चा करायला घेतात तेव्हा तो किती सशक्तपणे मांडता येऊ शकतो याचे छान उदाहरण आहे. विनायक वैभव जोशींना बोलते करत आठवणींची एक रम्य सैर घडवून आणतात.
इंजिनीअर्सचा विषय आहे तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा विषय येणे क्रमप्राप्त आहे आणि त्याच अनुषंगाने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) चे भविष्य काय असेल, ते कुठंपर्यंत झेप घेईल, त्यामुळे नोकऱयांचे काय होईल? कोणाकोणाला धोका संभवू शकतो अशा सर्व शक्य-अशक्यतांचा आढावा घेतला आहे प्रसिद्ध आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तज्ञ योगेश कुलकर्णी यांनी. एआय टूल्स शिकून आपण आपला पगार कसा वाढवू शकतो? एआय टूल्सचा फायदा काय? एआयमुळे आणि एआयसाठी आताच्या शिक्षण पद्धतीत कोणते बदल केले पाहिजेत? एआयच्या काळात करीअर कसे सांभाळावे? अशा असंख्य प्रश्नांवर यात चर्चा आहे. तरुण अभियंत्यांनी आणि सध्या व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱया मंडळींनी जरूर ऐकावा असा हा पॉडकास्ट. याच विषयावर प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांचा
पॉडकास्टही जरूर ऐकावा.
आताच आषाढी एकादशी झाली. या विठोबा माऊलीच्या भेटीसाठी निघणाऱया पावन वारीतून आपण काय शिकू शकतो हे सांगणारा प्रख्यात विचारवंत
डॉ. सदानंद मोरे यांचा पॉडकास्ट अत्यंत श्रवणीय आहे. सुधीर सरनोबत यांच्यासोबत केलेला पॉडकास्ट सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी उद्योजकतेच्या दृष्टीने मार्गदर्शक झाला आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये भारतीय लोकशाही, सुप्रशासन, राष्ट्रवाद, भविष्यातील भारत आणि महासत्ता होण्याचे प्रयत्न यावर विस्तृत भाष्य केले आहे.
प्रख्यात मानसोपचारतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या सोबतच पॉडकास्ट हादेखील ऐकण्यासारखा आहे. ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत विनय हर्डीकर यांनी त्यांच्या मागच्या 30 वर्षांचा राजकीय इतिहास मांडला आहे. आणीबाणीवरील मत, विरोधी पक्षांची भूमिका याबाबत ते बोलले आहेत. राजकारण, समाजकारणाच्या विद्यार्थ्यांसाठी हा पॉडकास्ट महत्त्वाचा ठरू शकतो. डॉ. धनश्री लेले यांचा अहंकार, गरज आणि मोह या दैनंदिन जीवनातील, परंतु क्लिष्ट गोष्टींचा आढावा नक्की ऐकण्यासारखा आहे.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)





























































