
>> डॉ. चिंतामण भोईर
डॉ. गिरीश लटके हे कल्याण शहरातील साहित्य, समाजकार्य, शिक्षण या सर्वच क्षेत्रांतील एक अग्रगण्य नाव. त्यांचे ‘चराग जालाओ यारो’ हा हिंदी भाषेतील आणि ‘रुजवावे पसायदान ओठी’ असे दोन कवितासंग्रह नुकतेच प्रकाशित झाले. ‘रुजवावे पसायदान ओठी’ हा कवितासंग्रह मानवी मूल्यांची जपणूक करणारा आणि वाचकाच्या मनाला समृद्ध करणारा एक उत्कृष्ट काव्यसंग्रह आहे. संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक ‘पसायदान’ या संकल्पनेचा आधुनिक संदर्भासह घेतलेला शोध या संग्रहातील कवितांमधून प्रकर्षाने जाणवतो.
‘पसायदान’ म्हणजे केवळ ओठांवर घोळणारी प्रार्थना नसून ती मानवी जगण्याचा अविभाज्य भाग बनावी हा उदात्त विचार या संग्रहाच्या शीर्षकातूनच व्यक्त होतो. सहिष्णुता आणि प्रेमाचे पसायदान स्वतःमध्ये रुजवावे हा प्रेमाचा संदेश कवीने ‘रुजवावे पसायदान ओठी’ या कवितासंग्रहात अत्यंत प्रभावीपणे दिला आहे. डॉ. गिरीश लटके यांची भाषाशैली अत्यंत सोपी, प्रवाही आणि थेट वाचकाच्या मनाला भिडणारी आहे. क्लिष्ट शब्दांचा वापर टाळून त्यांनी साध्या संवादात्मक रचनेतून गहन आशय मांडला आहे. त्यांच्या कवितामध्ये एक सुंदर लय आणि नादमयता आढळते, ज्यामुळे या कविता दीर्घकाळ स्मरणात राहतात. समाजाची ढासळत चाललेली वैचारिक पातळी आणि त्यामुळे संवेदनशील मनाची होणारी घुसमट कवीने ‘तडफड’ या कवितेच्या शब्दाशब्दांतून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली आहे.
नव्या नशेच्या गर्तेत जनता फसणार आहे
दिशा कोणती समाजाला कशी कळणार आहे?
अशी झिंग नयी चढेल बेहोशीची
विचार रुजतील नव्या जातीयवादी पोथीची…
‘दंग’ ही कविता अशीच प्रभावी आहे. माणूस जन्माला येतो, आयुष्यभर विविध गोष्टींच्या मागे धावतो आणि शेवटी रिकाम्या हाताने निघून जातो. या जगण्याच्या रहाटगाड्याचे आणि मानवी मनातील संभ्रमाचे अत्यंत टोकदार वर्णन करणारी ही एक चिंतनशील कविता आहे. कवीने केवळ देवाच्या अस्तित्वावर भाष्य न करता, माणसाच्या ‘मी’पणावर म्हणजेच अहंकारावर अत्यंत प्रभावीपणे बोट ठेवले आहे. ही रचना वाचकाला अंतर्मुख करून स्वतःकडे पाहण्यास भाग पाडते.
शोधण्यात देह जन्म गेला
देह येथेच ठेवून माणूस गेला
अनुभवण्यास सारेच सोबत असती
जगण्याची उठाठेव नुसती…
या ओळींमधून कवीने माणसाच्या धावपळीला ‘उठाठेव’ हा अतिशय समर्पक शब्द वापरला आहे. आपण जे काही मिळवतो, ते सर्व येथेच सुटणार आहे हे माहीत असूनही माणसाची चाललेली धडपड कवीने जळजळीतपणे मांडली आहे. कवितेच्या शेवटच्या दोन ओळी या संपूर्ण रचनेचा कळस आहेत. आजच्या जगात खरा भक्त तसेच देवत्व शोधूनही सापडत नाही. कारण प्रत्येक जण स्वतःच्याच विश्वात आणि स्वार्थात मग्न आहे.
‘रुजवावे पसायदान ओठी’ या संग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे निराशावादी वातावरणातही कवीने जपलेली कमालीची सकारात्मकता. समाजात कितीही दुष्ट प्रवृत्ती असल्या तरीही ‘सत्कर्मी रती वाढो’ हाच मुख्य सूर संपूर्ण संग्रहात पाहायला मिळतो.
प्रस्तुत संग्रहात 54 कविता आहेत. सर्व कविता मुक्तछंदात आहेत. प्रत्येक कवितेच्या शेवटी वाचक एका चांगल्या विचाराने प्रेरित होतो. मानवी मूल्ये, सामाजिक जाणीव आणि भावनांचा सुंदर प्रवास कवीने ‘रुजवावे पसायदान ओठी’ या कवितासंग्रहात शब्दबद्ध केला आहे. हा कवितासंग्रह मनास प्रगल्भ करणारे तसेच सकारात्मक ऊर्जा देणारे विचार मांडतो. आजच्या धावपळीच्या युगात माणुसकी आणि संवादाचा पूल बांधण्याचे काम या कविता करतात.
रुजवावे पसायदान ओठी
कवी : डॉ. गिरीश लटके
प्रकाशक : मैत्री पब्लिकेशन
पृष्ठ : 72 मूल्य : 120 रुपये





























































