
>> डॉ. समिरा गुजर जोशी ([email protected])
प्रेमात बुडालेल्या प्रेयसीच्या, विरहिणीच्या मनाची अवस्था जाणत कालिदासाने मेघदूतात रचलेले श्लोक लेखणीने नव्हे, तर कुंचल्याने चित्रच रेखाटावे इतका सौंदर्यपूर्ण आशय त्यातून उमगतो.
प्रेमात माणूस दुसऱयाला किती ओळखू शकतो? त्याच्या सवयी, त्याच्या मनाच्या हालचाली, एकांतात तो काय करीत असेल इतकेच नव्हे, तर आपण जवळ नसताना त्याचा दिवस कसा सरत असेल याचाही अंदाज बांधू शकतो का? कालिदासाचे मेघदूत वाचताना या प्रश्नाचे अत्यंत हळवे उत्तर मिळते. अलकानगरीपासून दूर रामगिरीवर शापित अवस्थेत राहणारा यक्ष मेघाला आपल्या प्रियेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगतो, पण उत्तरमेघात मेघ जसजसा तिच्याजवळ पोहोचतो, तसतसे कालिदासाचे काव्य जणू बाह्य प्रवास सोडून एका स्त्राrच्या अंतर्मनात प्रवेश करते. माझ्याशिवाय ती कशी असेल? मुळात इतकी सुंदर आहे ती, विधात्याने सगळ्यात पहिली घडवलेली स्त्राr तीच आहे असं वाटावी इतकी सुंदर आहे ती, पण आता दुःखात बुडून गेल्याने कशी म्लान दिसत असेल ती!
केवळ दुसरा प्राणच माझा मितभाषी ती जाण लाडकी, विरहें माझया मनीं झुरतसे चक्रवाकि वा जणुं एकाकी
कठीण दुरावा गाढ सोसतां असेल गेली म्लान होऊनी, शिशिराचा आघात सोसतां विशीर्ण व्हावी जशी कमलिनी!
माझी वाट बघत असताना रडून रडून डोळे सुजले असतील तिचे. स्वतकडे तर लक्ष नसेलच तिचे. केस मोकळे सुटलेले…विचारात गढून गेलेली ती कशी दिसते आहे?
तळहातावर वदन विसावे मुक्त केश त्यावरीं विखुरले
घनपटलीं जणुं केंविलवाणें बिंब शशीचें अर्धझांकलें ! – असे वाटते की, कालिदासाने हे श्लोक लेखणीने लिहिलेले नाहीत तर कुंचल्याने चित्रच रेखाटले आहे. त्याहून सुंदर आहे तिच्या दिनक्रमाची त्याने केलेली कल्पना. तो मेघाला सहज सांगतो – तू जाशील तेव्हा तुला ती कशी दिसेल ठाऊक आहे? तुला ती देवपूजेत मग्न दिसेल किंवा ती माझे चित्र काढत असेल? कसे? तर तिच्या विरहात कृश झालेला मी कसा दिसत असेन अशी कल्पना करून ती माझे चित्र काढत असेल किंवा पिंजऱयातल्या मैनेला जवळ घेऊन ‘स्मरति रसिके त्वं हि तस्य प्रियेति’ असे विचारत असेल? शांता शेळके यांच्या अनुवादात हा प्रसंग सहज उतरतो-
पिंजऱयातल्या मैनेला ती असेल किंवा पुसत कौतुके, स्मरती का गं, प्रियतम तुज ते? होतीस मजसम तुही लाडकी! – पण या छोटय़ाशा प्रसंगातही विरहिणीच्या मनाचा किती हळवा खेळ कालिदासाने टिपला आहे! मैना माणसाचे बोलणे ऐकून त्याची पुनरुक्ती करते. म्हणजे ‘स्मरती का गं, प्रियतम तुज ते? होतीस मजसम तुही लाडकी! हे शब्द मैनेच्या तोंडून तिला परत वदवून घ्यायचे आहेत. किती तरलपणे कालिदासाने हे चित्र उभे केले आहे. कालिदासाची सखीची कल्पना त्याने रघुवंशात अज-इंदुमतीच्या प्रेमकहाणीच्या निमित्ताने सांगितली आहे. गृहिणी सचिव सखी मिथ प्रियशिष्या ललिते कलाविधौ – ती घराची शोभा आहे, त्याच्या कामात त्याची सचिव आहे, त्याची मैत्रीण आहे, प्रत्येक गोष्टीत त्याची सहचर आहे, ललित कलांमध्ये तो निपुण आहे, तर ती त्याची प्रिय शिष्या आहे. सहजीवनाचे किती सुंदर चित्र आहे हे. आयुष्यातील जबाबदारी वा कलास्वाद – तो एकमेकांच्या संगतीत उपभोगणे हीच त्याची सुखाची अतिशय सोपी व्याख्या आहे. त्यामुळे ती माझ्या आठवणी जागवत काय काय करत असेल या मालिकेत आणखी एक सुंदर चित्र तो रेखाटतो की, ती वीणा मांडीवर घेऊन त्याच्याविषयी रचलेले गीत गाण्याचा प्रयत्न करीत असेल. पण मग काय होते? तर कालिदास कल्पना करतो –
मलिनवसनिं वा मांडीवरतीं वीणा घेऊन असेल बसली, नांव गुंफिलें जयांत माझें गीत गावया आतुर झाली
गातांना पण नयनीं आंसू ओघळती ते तारांवरतीं, स्वयें योजिल्या तानांचीही सखिला होते, हाय! विस्मृती! – बघा त्याची सखी गीतकारही आहे आणि संगीतकारही! तिने त्याचे नाव गुंफून गीत रचले आहे, त्याला चालही बांधली आहे, पण त्याचे नाव ओठांवर येताच तिच्या डोळ्यांतून अनावर अश्रू येतात आणि तिनेच बांधलेले गीत – पण तिला पुढे गाणे सुचत नाही. खरे तर थेट कारण नाही, पण मला या ओळी वाचल्या की ग्रेसांची आठवण येते. त्यांनीही लिहिले आहे ना – भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकवली गीते
या सगळ्या कल्पनांमध्ये एक विलक्षण गोष्ट दडली आहे. यक्षाला स्वतच्या प्रेमाची खात्री आहेच, पण त्याहून अधिक तिच्या प्रेमाची खात्री आहे. माझ्या अनुपस्थितीत ती मला विसरली असेल का? ही शंका त्याला जवळ जवळ नाही. उलट तिच्या प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी आपणच असू, असा त्याचा विश्वास आहे.
ठावें मज कीं तव वहिनीची अनन्य प्रीती माझ्या ठायी, वियोग पहिला त्यातुन म्हणुनी दशा सखीची कळे मलाही
बडबडतों मी फुका न धरूनी निजभाग्याची मनीं अहंता, प्रत्यक्षांतच पाहशील तूं मम वचनांमधिं किती सत्यता!
– आजच्या भाषेत याला केवळ romantic longing म्हणणे अपुरे ठरेल. हे एका नात्यातील खोल परिचयाचे चित्र आहे. प्रिय व्यक्ती समोर नसतानाही तिच्या मनात काय चालले असेल, हे जाणण्याइतके तिच्याशी तादात्म्य पावणे. कालिदासाची मोठी किमया इथेच आहे. म्हणून मेघदूतातील यक्षपत्नी ही केवळ ‘विरहिणी नायिका’ राहत नाही. ती वाट पाहणारी, आठवण जपणारी, स्वतला कामात गुंतवू पाहणारी व तरी प्रत्येक कृतीत प्रियकराकडेच परतणारी एक जिवंत व्यक्तिरेखा बनते आणि कदाचित म्हणूनच इतकी शतके उलटूनही तिचा विरह जुना वाटत नाही. काळ बदलतो, प्रेम व्यक्त करण्याची साधने बदलतात, पण आपल्या माणसाच्या अनुपस्थितीत ‘तो आता कुठे असेल’ आणि ‘ती आता काय करत असेल?’ हा विचार मात्र बदलत नाही.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङ्मयाच्या अभ्यासक आहेत.)





























































