
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. नरेंद्र मोदी यांचे आजचे भाषण खूपच मिळमिळीत होते. ते घाबरलेले, आत्मविश्वास हरवलेले वाटत होते, अशी टीका विरोधकांनी केली. मोदींनी दिमागी नक्षलची व्याख्या सांगावी, अशी मागणीही विरोधकांनी केली.
काँग्रेस, समाजवादी पक्षासह अनेक विरोधी नेत्यांनी मोदींच्या भाषणाचा समाचार घेतला. ‘लाल किल्ल्यावरील भाषणातून मोदी आधीच्या सरकारांनी केलेल्या सगळ्या कामाचे श्रेय घेत सुटले. हे जग माझ्यामुळेच चालले आहे असे ते बोलले नाही हे उपकारच झाले,’ असा टोला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हाणला. महिला आरक्षणावरून मोदींनी विरोधकांवर केलेल्या आरोपांना अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिले. ‘लाल किल्ला ही खोटे बोलायची जागा नाही. पण मोदी तिथून महिला आरक्षणावर सर्रास खोटे बोलले. महिला आरक्षण विधेयक संसदेत आधीच मंजूर झाले आहे. हे प्रत्येकाला माहीत आहे. ते तत्कळ लागू करावे ही आमची मागणी आहे, असे अखिलेश म्हणाले.
‘दिमागी नक्षल’ कोण?
मोदींनी ‘दिमागी नक्षल’ हा शब्द देशातील तरुण, तज्ञ, विद्यार्थी, राजकीय विरोधकांसाठी वापरला आहे, असा थेट आरोप खासदार कपिल सिब्बल यांनी केला. उलट भाजपने देशात तीन प्रकारचे हुकूमशहा निर्माण केले आहेत, असे ते म्हणाले. त्यातील ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, कुलगुरू, राज्यपाल आणि सरकारी जाहिरातींवर चालणारे खासगी चॅनेल हे सरकारी हुकूमशहा आहेत. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे सामाजिक, तर तिसऱ्या प्रकारात जन्मजात हुकूमशहा आहेत, असे सिब्बल यांनी सुनावले.































































