
वसई-विरार महापालिकेच्या जनता दरबारात भाजप आणि बविआमध्ये जोरदार राजकीय फटाके फुटले. वीज प्रश्न, वाढवलेली पाणीपट्टी तसेच उड्डाणपुलांच्या प्रश्नांवरून बविआचे नेते, माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजप आमदार राजन नाईक यांना खडे बोल सुनावले. मला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराच त्यांनी दिला.
महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेचा जनता दरबार पार पडला. यावेळी भाजप आमदार राजन नाईक, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी राजन नाईक यांनी कामण येथील ईएचव्ही उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत चिखलडोंगरी उपकेंद्राची जागा कोस्टल रोडमुळे बदलावी लागल्याचे स्पष्ट केले. तसेच आचोळे येथील प्रस्तावित रुग्णालयासाठी आवश्यक असलेली जागा महापालिकेला विनामूल्य मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. त्यावर हितेंद्र ठाकूर यांनी नुसते हे केले ते केले सांगू नका… तुम्ही काय केले ते सांगा… मला उगीच तोंड उघडायला लावू नका, असा इशारा दिला.
वीज प्रश्नावर बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी माझ्या कार्यकाळात चार-पाच दिवस वीज गायब होण्याची कधी वेळ आली नव्हती. कामण, विरार, मारंबळ पाडा, चिंचोटी आणि विरार पूर्व येथील वीज उपकेंद्रांना आपल्या कार्यकाळात मंजरी मिळवन दिली. मात्र २०२४ मध्ये मंजूर झालेल्या सात अंतर्गत पूल आणि चार रेल्वे उड्डाणपुलांच्या कामाचे काय झाले याचे उत्तर भाजप आमदाराने द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले. पाणीपट्टी वाढवली तेव्हा कोण आमदार होते होते, असे थेट सवाल ठाकूर यांनी राजन नाईक यांना केला.























































