स्वार्थासाठी पालिका यंत्रणा राबविणाऱ्यांना सोडणार नाही; गणेश नाईक यांचा इशारा नेमका कोणाला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई शहरात आम्ही सांगू तेच होणार, जे काय करायचे ते सगळे आम्हीच करणार, असा कोणी समज करून घेतला असेल तर तो खपवून घेणार नाही. स्वतःच्या हव्यासापायी नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा राबविणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा वन मंत्री गणेश नाईक यांनी दिला आहे. मात्र त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नसल्याने हा इशारा नेमका कोणासाठी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नवी मुंबईच्या विकासाच्या नावाखाली पालिका यंत्रणेचा वापर करून कुणाचे वैयक्तिक हित साधले जात असेल तर त्याला ठाम विरोध करण्यात येणार आहे. बनावट कागदपत्रांच्या तक्रारीची चौकशी करून तथ्य आढळल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली नियमांची पायमल्ली, खोटी कागदपत्रे किंवा अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही, असा घणाघात वन मंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे घेण्यात आलेल्या जनता दरबारात केला. ‘नैवेद्य’ आणि ‘अलबेला’ प्रकल्पांना दिलेल्या बांधकाम परवानग्या व भोगवटा प्रमाणपत्रांची चौकशी करून संबंधित बांधकामे तोडून टाका. नियमांचे उल्लंघन झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देशही नाईक यांनी आयुक्तांना दिले आहेत.

घर द्यायला शिका, तोडायला नाही

वाशीतील नैवेद्य आणि अलबेला इमारती तोडण्याचा निर्देश गणेश नाईक यांनी दिल्यानंतर भाजपच्या बेलापूरमधील आमदार मंदा म्हात्रे यांनी या दोन्ही इमारतींमधील रहिवाशांची भेट घेतली. तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा त्यांनी रहिवाशांना देऊन घर द्यायला शिका, तोडायला शिकू नका, असा टोला त्यांनी गणेश नाईक यांना लगावला. भाजपचे मंत्री आणि आमदार आमने सामने आल्याने वरिष्ठांची डोकेदुखी वाढली आहे.